बारामती संचारच्या बातमीचा इम्पॅक्ट! गुणवडीत प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्यावर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
₹1 लाख 41 हजार 848 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त; एकावर गुन्हा दाखल
बारामती : बारामती शहर व परिसरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या खुलेआम सुरू असलेल्या विक्रीबाबत ‘बारामती संचार’ने सातत्याने आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. या वृत्तांकनानंतर गुणवडी येथे अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे.
गुणवडी येथील गट नं. 901, 29 फाटा रोड परिसरात अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी 6 ऑगस्ट रोजी कारवाई केली. या कारवाईत विविध कंपन्यांचा गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखू असा एकूण ₹1,41,848 किमतीचा साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी गणेश बापूराव कसबे यांच्याविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0315/2026 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी संदीप दिनकरराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळी तपासणी केली असता महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला, गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे आढळून आले. संबंधित साठ्याची तपासणी करून त्यातील प्रतिनिधिक नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले, तर उर्वरित माल ताब्यात घेण्यात आला.
‘बारामती संचार’च्या वृत्तांकनानंतर प्रशासनाची कारवाई?
बारामती परिसरात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी आणि प्रश्न ‘बारामती संचार’ने आपल्या वृत्तांमधून सातत्याने उपस्थित केले होते. या पार्श्वभूमीवर गुणवडीतील झालेली कारवाई ही प्रशासनाच्या हालचालींना वेग आल्याचे चित्र निर्माण करणारी ठरली आहे.
कारवाईदरम्यान गुलाम गुटखा, के. आर. 1000 गुटखा, विमल पानमसाला, V1 तंबाखू, RMD पानमसाला आणि मिंट सेंटेड टोबॅको यांसह विविध प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळला. जप्त मालाची एकूण बाजारभावानुसार किंमत ₹1,41,848 असल्याचे FIRमध्ये नमूद आहे.
फक्त विक्रेत्यावर कारवाई पुरेशी आहे का?
या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जप्त करण्यात आलेला माल नेमका कोणाकडून आला, त्याचा पुरवठादार कोण, वाहतूक कोणी केली आणि हा माल कोणत्या साखळीमार्फत बारामतीत पोहोचला, याचा तपास होणे आवश्यक आहे.
स्वतः अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी FIRमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा पुरवठादार, वाहतूकदार आणि उत्पादक यांच्यापर्यंत सखोल तपास करण्याची विनंती केली आहे. तसेच घटनास्थळी या मालाची खरेदी बिले मिळाली नसल्याचेही FIRमध्ये नमूद आहे.
त्यामुळे आता पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या तपासात गुटख्याचा मूळ पुरवठादार कोण? बारामतीत हा माल आणणारी साखळी कोणती? आणि प्रतिबंधित मालाच्या विक्रीचे जाळे किती मोठे आहे? याची उत्तरे समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
₹1.41 लाखांचा माल जप्त; पुढील तपासाकडे लक्ष
या प्रकरणात अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील विविध कलमांसह भारतीय न्याय संहितेतील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार रामचंद्र वामनराव शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
‘बारामती संचार’च्या वृत्तांकनानंतर झालेली ही कारवाई प्रतिबंधित गुटखा विक्रीविरोधातील एक महत्त्वाची पायरी मानली जात आहे. मात्र, केवळ साठा जप्त करून प्रकरण थांबता कामा नये; या साठ्याच्या मागे असलेल्या संपूर्ण पुरवठा साखळीपर्यंत तपास पोहोचणार का, याकडे आता बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.


