पोलिसांच्या गालथान कारभाराचा गैरफायदा; कच्चा कैद्याच्या पलायनाचा प्रयत्न फसला!
बारामती, 26 मार्चः बारामती शहर पोलीस स्टेशनच्या कस्टडीत असलेला आरोपी भेरू भानुदास शिंदे याने पलायनाचा अयशस्वी प्रयत्न केला असून त्यात आरोपीचे पाय मोडलेला आहे. सविस्तर हकीकत अशी की, आरोपी भेरू भानुदास शिंदे, हा आरोपी बारामती शहर पोलीस यांच्या जेलमध्ये असताना पोलिसांच्या गालथान कारभाराचा गैरफायदा घेऊन पळून जात असताना त्याचे पाय मोडलेला आहे. या बाबत कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांबाबत उलटसुलट चर्चा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये चालू आहे. गेले वर्षभर सदर आरोपी बारामती शहर पोलीस कारागृहात राहत असून त्याला येरवडा कारागृहात वर्ग केला गेला नाही. तो कच्चा कैदी असतानाही कारागृहाच्या परिसरात मोकळा फिरत असताना अनेकांनी याआधी पाहिला आहे. त्यामुळे सदर आरोपीला बारामती कारागृहात का ठेवला? व त्याची रवानगी येरवडा कारागृहात का केली गेली नाही? हा प्रश्न चिन्ह आहे. दुसरीकडे, बारामती कारागृहात कैद्यांची संख्या जास्त असताना मानवी सुख सोयी व हक्कांचा उल्लंघन होत असताना अशा विशिष्ट कैद्यांना अर्थपुर्ण व्यवहारातून सबजेल (उपकारागृह) मध्ये कोणाच्या आशिर्वादाने ठेवण्यात येते? याची चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी सामान्य बारामतीकर करत आहे. तर या आरोपीला असाधारण वागणूक कोणाच्या सांगण्यावरून व का देण्यात आली? याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी आरपीआय बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी केली आहे. ज्या कर्मचारी व अधिकाऱ्यांमुळे गेले वर्षभर सदर कैदी उपकारागृहात रोज पाहुणचार घेत होता. त्या अधिकारी व कार्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी आरपीआय (आठवले गट) कडून होत आहे. या बाबत वरिष्ट पोलीस अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले असून सदर आरोपी आणि पोलीस खात्याचे हितसंबंध बाबत सुरस कथा चर्चिल्या जात आहेत.