माळेगावात ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ हजारांचा मुद्देमाल जप्त


माळेगावात ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

माळेगाव : माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत माळेगाव-कऱ्हावागज रस्त्यालगत एका गाळ्यामध्ये सुरू असलेल्या कथित ऑनलाइन जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ₹१३ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत राहुल भारत भोसले (वय ३५, रा. माळेगाव खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमातील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना २२ ऑगस्ट २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माळेगाव-कऱ्हावागज रस्त्यालगतच्या गाळ्यामध्ये ‘फनटारगेट’ नावाचा ऑनलाइन जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन संबंधित ठिकाणी सायंकाळी सुमारे ७.३० वाजता छापा टाकला.

Advertisemen

छाप्यावेळी एक व्यक्ती संगणक संचासह बसलेला आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव राहुल भारत भोसले असल्याची नोंद केली. संगणकाची तपासणी केली असता त्यामध्ये १ ते १० आकडे आणि चक्री फिरत असल्याचे दिसून आल्याचे FIRमध्ये नमूद आहे. त्यावरून संबंधित ठिकाणी ऑनलाइन जुगार सुरू असल्याची पोलिसांची खात्री झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी LG कंपनीचा ४३ इंची LED टीव्ही, HP कंपनीचा CPU, LAPCARE कंपनीचा की-बोर्ड, माउस आणि ₹९०० रोख रक्कम असा एकूण ₹१३,०५० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस हवालदार अमोल संदीपान राऊत यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार विष्णुपंत बळभीम गायकवाड करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »