माळेगाव पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपी मुद्देमालासह काही तासांतच जेरबंद


बारामती: बारामती परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दलाने कंबर कसली आहे. याच अनुषंगाने, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या निर्देशानुसार, माळेगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कामगिरी केली आहे.

माळेगाव पोलिसांनी एका जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासांत उघडकीस आणत दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. ३ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास, शिरष्णे येथील भीमराव रामचंद्र पिंगळे हे आपल्या मोटारसायकलवरून फलटण-बारामती रोडने पाहुणेवाडी गावच्या हद्दीतून घरी जात असताना, दोन अनोळखी इसमांनी त्यांची मोटारसायकल आडवी मारली. त्यानंतर त्यांना मारहाण करून त्यांचा विवो कंपनीचा मोबाईल आणि खिशातील १८,००० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेले.
या घटनेची माहिती मिळताच, माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला (गु.र.नं १४६/२०२५ बी.एन.एस क.३०९ (४), ३०९ (६) वगैरे). सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे यांनी तात्काळ गुन्हे पथकाला बोलावून या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मार्गदर्शन केले. फिर्यादीकडून माहिती घेताना, आरोपींनी आपापसात बोलताना ‘अक्षय’ असे नाव घेतल्याचे समोर आले.

Advertisemen

या माहितीच्या आधारे, प्रभारी अधिकारी सचिन लोखंडे आणि गुन्हे पथकाने गुप्त माहितीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. अथक प्रयत्नांनंतर, अक्षय चंद्रकांत जाधव (वय २४, रा. खांडज, ता. बारामती) आणि मनोज उर्फ बाबू शिवराज गालफाडे (वय १९, रा. बुरूडगल्ली, पाहुणेवाडी, ता. बारामती) यांना ताब्यात घेण्यात आले. कसून चौकशी केली असता, त्यांनी सदर जबरी चोरी केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेला विवो कंपनीचा मोबाईल आणि ५,००० रुपये रोख रक्कम असा एकूण १८,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे हे करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन लोखंडे, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पो. हवालदार राहुल पांढरे, विजय वाघमोडे, अमोल राऊत, ज्ञानेश्वर मोरे, नितीन कांबळे, जयसिंग कचरे आणि अमोल वाघमारे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. यामुळे बारामती परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »