सुपा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी: अवघ्या २४ तासांत चोरीला गेलेला ट्रॅक्टर परत मिळवला


जवळपास २४ तासांच्या आत, सुपा पोलिसांनी एका शेतकऱ्याचा चोरीला गेलेला ट्रॅक्टर आणि नांगर परत मिळवून एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे.

बारामती, पुणे: सुपा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत एका शेतकऱ्याचा चोरीला गेलेला ५ लाख ३० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि नांगर हस्तगत करत धडाकेबाज कामगिरी केली आहे. या प्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

आंबी बुद्रुक येथील शेतकरी राजेंद्र बबन खोमणे यांचा जॉनडियर कंपनीचा ५०४५ मॉडेलचा हिरव्या रंगाचा ट्रॅक्टर (किंमत ५,००,०००/- रुपये) आणि ३०,०००/- रुपये किमतीचा लाल रंगाचा नांगर १ जून २०२५ रोजी रात्री ८:३० ते २ जून २०२५ रोजी सकाळी ५:३० दरम्यान चोरीला गेला होता. या प्रकरणी सुपा पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ९९/२०२५ अन्वये कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सुपा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी मनोजकुमार नवसरे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार किसन ताडगे, महादेव साळुंके आणि भाऊसाहेब चौधरी यांना तपासाच्या सूचना देऊन रवाना केले.
गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहिती, तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी बाळा उर्फ अविष्कार संजय तावरे (वय २३, रा. मोरगाव), धिरज संदिप चव्हाण (वय १८, रा. मुर्ती), रोहन ज्ञानेश्वर माने (वय १९, रा. मोढवे), चेतन कानोबा दगडे (वय २५, रा. मोढवे) आणि ओमकार रमेश पवार (वय २७, रा. मोरगाव) या पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Advertisemen

पोलिसांनी आरोपींकडून चोरलेला ५,००,०००/- रुपये किमतीचा जॉनडियर ट्रॅक्टर आणि ३०,०००/- रुपये किमतीचा नांगर असा एकूण ५,३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला आहे. सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार वसंत वाघोले करत आहेत.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मनोजकुमार नवसरे, पो.स.ई. जिनेश कोळी, पो. हवा. रुपेश साळुंके, राहुल भाग्यवंत, संदिप लोंढे, विशाल गजरे, दत्तात्रय धुमाळ, पो.कॉ. किसन ताडगे, महादेव साळुंके, भाऊसाहेब चौधरी, ऋषीकेश विर, निहाल वणवे, सुरज साळुंके, सचिन दरेकर, सागर वाघमोडे, तुषार जैनक, सचिन कोकणे आणि आदेश मवाळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
सुपा पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला असून, यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक निर्माण झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »