इंदापूरात 23 लाख 87 हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू साठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हा
इंदापूरात 23 लाख 87 हजारांचा प्रतिबंधित पानमसाला-तंबाखू साठा जप्त; तिघांविरुद्ध गुन्हाइंदापूर
इंदापूर : महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा वाहतूक करणारे महिंद्रा पिकअप वाहन इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची किंमत 15 लाख 87 हजार 640 रुपये, तर वाहनाची अंदाजे किंमत 8 लाख रुपये असून एकूण मुद्देमालाची किंमत 23 लाख 87 हजार 640 रुपये आहे.
ही कारवाई 21 ऑगस्ट 2026 रोजी करण्यात आली. इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक MH-42-BU-1029 आढळून आले. तपासणी केली असता वाहनामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळला.
या प्रकरणात आजमखान मोहम्मद पठाण (वय 29, रा. सरस्वतीनगर, इंदापूर), सोहेल आस्लम शेख (रा. शेख मोहल्ला, इंदापूर) तसेच कर्नाटकातील कमलेश याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. कमलेश याचे पूर्ण नाव अद्याप समोर आलेले नसल्याचे FIR मध्ये नमूद आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये विमल पानमसाला बिग पॅकचे 1,047 पॅकेट, VHI-1 तंबाखू बिग पॅकचे 1,047 पॅकेट, विमल पानमसाला किंग पॅकचे 4,837 पॅकेट आणि VHI-1 तंबाखूचे 4,837 पॅकेट असल्याचे नमूद आहे.
FIR नुसार, हा प्रतिबंधित माल कर्नाटक येथून आणण्यात आला होता. वाहनचालकाने हा माल सोहेल आस्लम शेख याच्या सांगण्यावरून आणल्याचे सांगितले असून मालाच्या खरेदीची कोणतीही बिले सादर करण्यात आली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे.
महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाला, सुगंधित किंवा स्वादिष्ट सुपारी आणि तत्सम पदार्थांच्या उत्पादन, साठवणूक, वितरण व विक्रीवर बंदी असल्याचे FIR मध्ये नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा सखोल तपास करून प्रतिबंधित मालाचा पुरवठादार, वाहतूकदार, उत्पादक आणि वाहनमालक यांच्यापर्यंत तपास पोहोचवण्याची मागणी करण्यात आली आहे. जप्त माल व वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी सीलबंद करून पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक हनुमंत झुंबर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


