पानगल्लीत ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४,१०० चा मुद्देमाल जप्त


पानगल्लीत ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; ४,१०० चा मुद्देमाल जप्त

बारामती, दि. २७ : बारामती शहरातील पानगल्ली परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला असून, मच्छी मार्केटजवळ सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाडसी कारवाई केली. या कारवाईत जुगारासाठी वापरले जाणारे संगणकीय साहित्य आणि रोख रक्कम असा ₹४,१०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, १८८७ च्या कलम ४ व ५ अन्वये बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisemen

पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे पानगल्ली येथील मच्छी मार्केट परिसरात सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री जुगारावर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून जुगारासाठी वापरले जाणारे एलईडी स्क्रीन, सीपीयू, की-बोर्ड, माऊस तसेच ₹२,१०० रोख रक्कम जप्त करण्यात आली.

जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत ₹४,१०० इतकी असून, पंचनामा करून सर्व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

बारामती शहरात ऑनलाइन माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार व्यवसायावर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला असून, अशा प्रकारांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे या धाडीतून स्पष्ट झाले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »