दोन ड्रममागचा सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात; ४७८ किलो गांजा प्रकरणात विकी कांबळे अटकेत


दोन ड्रममागचा सूत्रधार अखेर पोलिसांच्या जाळ्यात; ४७८ किलो गांजा प्रकरणात विकी कांबळे अटकेत

बारामती : जळोची येथील शेतात दोन मोठ्या ड्रममध्ये सापडलेल्या तब्बल ४७८.९५० किलो गांजाच्या साठ्यामागील संशयित सूत्रधार विकी विजय कांबळे याला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. सहा महिन्यांच्या तपासानंतर २ सप्टेंबर रोजी रात्री त्याला अटक करण्यात आली. ३ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

२८ फेब्रुवारी २०२६ रोजी जळोची, पिंपळी रोड परिसरातील एका शेतात गांजा साठवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारवाई केली असता ‘समृद्धी अॅक्वा’ कंपनीचे १५०० लिटर क्षमतेचे दोन प्लास्टिक ड्रम आढळले. त्यामध्ये ४६५ पॅकेट्समध्ये तब्बल ४७८.९५० किलो गांजा आढळून आला. या गांजाची अंदाजे किंमत २ कोटी ३९ लाख ४७ हजार ५०० रुपये होती.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७८/२०२६, NDPS Act अंतर्गत कलम 20(b)(ii)(C), 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

CDR, CCTV आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास

गांजा सापडला; मात्र तो कोणी आणला, कोठून आणला आणि पुढे कोणाला वितरित केला जाणार होता, याचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी CDR, Dump Data, IMEI Mapping, मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, वाहनांच्या हालचाली आणि सहआरोपींची चौकशी अशा विविध माध्यमातून तपास सुरू ठेवला.

या तपासात प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, समाधान धर्मराज गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, विकी विजय कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंग आणि जॉकी माझी यांचे धागे समोर आले. यापैकी काही आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

तपासाचा धागा थेट ओडिशापर्यंत

तपासादरम्यान विकी कांबळेचा ओडिशातील जॉकी माझी याच्याशी संपर्क असल्याचे समोर आले. तसेच संग्राम उर्फ चंदन सिंग याची भूमिकाही तपासाच्या केंद्रस्थानी आली. त्यामुळे जळोचीतील गांजा प्रकरणामागे आंतरराज्यीय पुरवठा साखळी असल्याचा संशय बळावला.

Advertisemen

दरम्यान, विकी कांबळेच्या हालचालींची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी मिळालेली माहिती सांगली स्थानिक गुन्हे शाखेला दिल्यानंतर कुपवाड MIDC पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात आली.

या कारवाईत इनोव्हा वाहनातून १३४ किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या गांजाची किंमत सुमारे ३३ लाख ५० हजार रुपये होती. वाहन, मोबाईल व इतर साहित्य मिळून ४२ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बारामतीतील दोन गुन्ह्यांत ५०१.९६० किलो गांजा

बारामती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक ७८/२०२६ मध्ये ४७८.९५० किलो, तर गुन्हा क्रमांक १९०/२०२६ मध्ये २३.०१० किलो, असा एकूण ५०१.९६० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. सांगलीतील १३४ किलो गांजा जप्तीची कारवाई विचारात घेतल्यास संबंधित तपासातील गांजाची मात्रा ६३५.९६० किलोपर्यंत पोहोचते.

पोलिस कोठडीत सखोल तपास

विकी कांबळेच्या पोलीस कोठडीदरम्यान गांजाचा मूळ स्रोत, ओडिशापासून बारामतीपर्यंतची वाहतूक साखळी, वापरलेली वाहने, मोबाईल व डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, सहआरोपींची भूमिका आणि गांजा साठवणूक व वितरणाची ठिकाणे याबाबत तपास केला जाणार आहे.

उर्वरित आरोपींचा शोध आणि संपूर्ण ‘सोर्स टू डेस्टिनेशन’ नेटवर्क उघड करण्यासाठी बारामती शहर पोलिसांचा तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कारंडे तसेच बारामती शहर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-अंमलदारांनी तपासात विशेष परिश्रम घेतले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »