बारामतीत अनधिकृत बांधकामप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
बारामतीत अनधिकृत बांधकामप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा
ननावरे गाढवे कॅपिटलमधील बांधकाम व पार्किंग व्यवस्थेबाबत तक्रार; मंजूर नकाशाच्या उल्लंघनाचा आरोप
बारामती, प्रतिनिधी : बारामती शहरातील ननावरे गाढवे कॅपिटल या इमारतीच्या बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा आणि पार्किंग व्यवस्थेबाबत कथित अनियमितता झाल्याच्या आरोपावरून तिघांविरुद्ध बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५२(१)(ब) आणि ५३ अंतर्गत १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदविण्यात आला आहे.
FIR मधील तक्रारीनुसार, संबंधित इमारतीसाठी ९ एप्रिल २०२२ रोजी बांधकाम परवानगी देण्यात आली होती. मंजूर नकाशात सहा कार आणि बारा दुचाकींच्या पार्किंगची तरतूद दर्शविण्यात आली होती. मात्र, २३ जून २०२६ रोजी प्रत्यक्ष पाहणी केली असता पार्किंग व्यवस्थेबाबत अनियमितता आढळल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.
मंजूर नकाशाव्यतिरिक्त बांधकाम करण्यात आल्याचा तसेच आवश्यक प्रमाणपत्रे व परवानग्यांबाबतही तक्रारीत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. नगरपरिषदेकडून नोटीस देण्यात आल्यानंतरही कथित अनधिकृत बांधकामाबाबत समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी अजिंक्य जनार्दन रणदिवे, किशोर रुद्रमणी गाढवे आणि उमेश शशिकांत ननावरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास बारामती शहर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल बाजीराव कांतिलाल गर्जे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
संबंधित इमारतीचे बांधकाम मंजूर नकाशानुसार झाले आहे का, पार्किंगची प्रत्यक्ष व्यवस्था काय आहे आणि आवश्यक परवानग्या व प्रमाणपत्रांचे पालन करण्यात आले आहे का, याबाबत तपासातून स्पष्टता येणार आहे. तसेच नगरपरिषदेने दिलेल्या नोटिशीनंतर कोणती कार्यवाही केली, याचीही चौकशी महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होणे म्हणजे आरोप सिद्ध होणे नव्हे. या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपास व न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होईल. संबंधितांची बाजू उपलब्ध झाल्यानंतर तीही प्रसिद्ध केली जाईल.
— बारामती संचार


