म्हसोबा मंदिरातील चांदीचा घोडा व पादुकांची चोरी उघड; बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई


म्हसोबा मंदिरातील चांदीचा घोडा व पादुकांची चोरी उघड; बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

बारामती, दि. ३ : तांदुळवाडी रोडवरील कल्पनानगर परिसरातील म्हसोबा मंदिरातून चोरीस गेलेला चांदीचा घोडा आणि चांदीच्या पादुकांचा जोड बारामती शहर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे हस्तगत केला आहे. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदारांची माहिती आणि संशयितांकडून करण्यात आलेल्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी या चोरीचा उलगडा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ जुलैच्या रात्री ते ६ जुलै २०२६ च्या सकाळदरम्यान अज्ञात चोरट्याने म्हसोबा मंदिराचे कुलूप तोडून चांदीचा घोडा व पादुकांचा जोड चोरून नेला होता. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धार्मिक स्थळातील चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्याचवेळी गोपनीय माहितीच्या आधारे दोन संशयित युवक चांदीच्या वस्तू विक्रीसाठी फिरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी या वस्तू इतर तिघांनी विक्रीसाठी दिल्याची माहिती दिली.

यानंतर पोलिसांनी आणखी तीन जणांना ताब्यात घेऊन स्वतंत्र व संयुक्त चौकशी केली. चौकशीत एका विधीसंघर्षग्रस्त बालकाने म्हसोबा मंदिरातून चांदीचा घोडा व पादुकांचा जोड चोरी करून तो इतरांच्या मदतीने विक्रीसाठी दिल्याचे निष्पन्न झाले. संबंधित बालकाची ओळख कायदेशीर तरतुदीनुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे.

Advertisemen

या प्रकरणात पोलिसांनी आदित्य विलास बगाडे (२१), अथर्व विलास बगाडे (१९), अथर्व राजेंद्र ननावरे (१९), कुंदन सुनील काजळे (२५) यांच्यासह एका विधीसंघर्षग्रस्त बालकावर कारवाई केली आहे.

संशयितांकडून जप्त करण्यात आलेल्या चांदीच्या वस्तू फिर्यादीस दाखविण्यात आल्या असता, त्यांनी त्या म्हसोबा मंदिरातील चोरीस गेलेल्या वस्तू असल्याची खात्रीपूर्वक ओळख पटवली. त्यानंतर सोनारामार्फत वजन व शुद्धतेची तपासणी करून कायदेशीर पंचनाम्याद्वारे मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांच्या मते, आरोपींनी चोरीचा मुद्देमाल विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, चांदीच्या वस्तूंसह फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करत चोरीचा पर्दाफाश केला.

या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, चोरीपूर्वी रेकी करण्यात आली होती का आणि चोरीचा माल कोणाला विकला जाणार होता, यासह आरोपींचा इतर गुन्ह्यांशी संबंध आहे का, याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस हवालदार यशवंत पवार, रामचंद्र शिंदे, अभिजीत कांबळे तसेच पोलीस शिपाई पोपट कवितके, अक्षय सिताफ, गिरीश नेवसे, दत्ता मदने, तानाजी गोरे, ऋषिकेश जाधव, सागर जामदार आणि विशाल शिंदे यांनी सहभाग घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »