स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; URD CHAMPIONS विजेता
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; URD CHAMPIONS विजेता
करावागज, दि. ३ : करावागज येथे जय महाकाल भैरवनाथ क्रिकेट क्लबच्या वतीने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेला खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यंत चुरशीच्या अंतिम सामन्यात दमदार खेळ करत URD CHAMPIONS संघाने विजेतेपद पटकावले, तर ओम वॉरियर्स, शेंडकर वस्ती संघाने उपविजेतेपद मिळविले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला देविदास सोमनाथ गावडे (संचालक, माळेगाव सहकारी साखर कारखाना) यांच्या वतीने ₹२०,००० रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. उपविजेत्या संघाला गणेश मुकुंदा नेवसे यांच्या वतीने ₹१०,००० रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच अभिजित झगडे यांच्या सौजन्याने विजेते व उपविजेते संघांना आकर्षक चषक प्रदान करण्यात आले. विजय तात्या नलावडे यांच्या सौजन्याने प्रत्येक सामनावीरास आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेत सहा गावस्तरीय आणि सहा स्थानिक अशा एकूण १२ संघांनी सहभाग नोंदविला. संपूर्ण स्पर्धेत सर्व संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. प्रत्येक सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार आणि थरारक ठरल्याने क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंना उत्स्फूर्त दाद दिली.
स्पर्धेदरम्यान आक्रम शेख आणि सक्षम काटे यांनी घेतलेले अप्रतिम झेल विशेष आकर्षण ठरले. संपूर्ण स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या नवाज शेख याला मॅन ऑफ द सिरीज पुरस्काराने गौरविण्यात आले. आसिफ सय्यद याने सर्वोत्कृष्ट फलंदाज, तर भाऊ ढोणे (लारा) यांनी सर्वोत्कृष्ट गोलंदाज हा मान पटकावला.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जय महाकाल भैरवनाथ क्रिकेट क्लब, मेडद यांच्या वतीने सर्व बक्षीसदाते, सहभागी संघ, खेळाडू, पंच, स्वयंसेवक तसेच मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला यशस्वी करणाऱ्या सर्व क्रिकेटप्रेमी आणि प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.


