राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत बारामतीच्या खेळाडूंचा दबदबा! कर्नाटकच्या रणभूमीवर महाराष्ट्राच्या डॉजबॉलपटूंची तिहेरी गर्जना!
बारामती : कर्नाटक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत तिहेरी यश संपादन केले आहे. पुरुष संघाने आपल्या दमदार खेळाच्या बळावर छत्तीसगड, गोवा, बिहार, कर्नाटक, पुदुचेरी यांसारख्या तगड्या संघांना धूळ चारली. अंतिम लढतीत हरयाणाला पराभूत करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आणि विजेतेपदाचा मान मिळवला.
यासोबतच, महाराष्ट्र महिला संघानेही उत्कृष्ट खेळ प्रदर्शन करत रौप्यपदकाची कमाई केली, तर मिश्र संघाने कास्यपदक पटकावत राज्यासाठी तिहेरी यश निश्चित केले.
या शानदार विजयामुळे राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने तिहेरी मुकुट आपल्या नावे केला असून, बारामतीच्या खेळाडूंनी आपल्या शहराचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर पोहोचवला आहे. या नेत्रदीपक कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंवर नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ही कौतुकास्पद कामगिरी निश्चितच इतर युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे.