बारामती शहर पोलिसांची धडक कारवाई; एकाच दिवशी दोन मटका अड्ड्यांवर छापे


बारामती शहर पोलिसांची धडक कारवाई; एकाच दिवशी दोन मटका अड्ड्यांवर छापे

शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावरही कारवाई; पोलिसांचे नागरिकांना अवैध धंद्यांची माहिती देण्याचे आवाहन

बारामती : बारामती शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी बारामती शहर पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी तीन ठिकाणी धडक कारवाई केली. यामध्ये पानगली आणि सटवाजीनगर परिसरातील दोन कल्याण मटका अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. तसेच शैक्षणिक संस्थेच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली.

ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

पानगलीतील मटका अड्ड्यावर छापा

पानगली परिसरात कल्याण मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. या कारवाईत अभिजीत किशोर शिंदे (वय 27, रा. पानगली, बारामती) याला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडून 560 रुपये रोख, मटका जुगाराच्या स्लीप बुक, आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या आणि लेखन साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 354/2026, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 मधील कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सटवाजीनगरमध्येही मटका जुगारावर कारवाई

यानंतर सटवाजीनगर येथील न्यू टी हाऊस परिसरात सुरू असलेल्या कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी चंदन अशोक खुलसे (वय 25, रा. प्रबुद्धनगर, आमराई, बारामती) याला ताब्यात घेण्यात आले.

Advertisemen

त्याच्याकडून 610 रुपये रोख, दोन स्लीप बुक, जुगाराच्या आकड्यांच्या नोंदी असलेल्या चिठ्ठ्या आणि लेखन साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा रजि. नं. 355/2026, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 मधील कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाविद्यालयाच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर कारवाई

दरम्यान, माळेगाव कॉलनी, शारदानगर येथील आर.जी. ट्रेडर्स या दुकानावरही पोलिसांनी कारवाई केली. शारदाबाई पवार महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आल्याने रविंद्र मोहनलाल गायकवाड (वय 38, रा. देवगिरी पार्क, जामदार रोड, कसबा, बारामती) याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात खटला रजि. नं. 06/2026, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने नियंत्रण कायद्यातील कलम 6(ब) व शिक्षा कलम 24 अन्वये खटला दाखल करण्यात आला आहे.

“अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना द्या”

बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मटका, सट्टा, जुगार, अवैध दारू, अंमली पदार्थ, ऑनलाइन जुगार तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर विक्री यासह कोणताही अवैध धंदा सहन केला जाणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

शहरात कुठेही अवैध धंदा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी डायल 112 किंवा बारामती शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शक्य असल्यास अचूक लोकेशन, फोटो किंवा व्हिडिओ सुरक्षित अंतरावरून पोलिसांना देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

“अवैध धंदा दिसला तर दुर्लक्ष करू नका—डायल 112 वर माहिती द्या. माहिती नागरिकांची, पडताळणी पोलिसांची आणि कारवाई कायद्याची,” असे बारामती शहर पोलिसांनी म्हटले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »