५० वर्षांच्या अखंड सेवेसाठी प्रदीप पंढरीनाथ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार
५० वर्षांच्या अखंड सेवेसाठी प्रदीप पंढरीनाथ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार
मुंबई, दि. १ ऑगस्ट (प्रतिनिधी – गुरुनाथ तिरपणकर): आयुर्विद्या प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय, शिव (मुंबई) येथे शनिवारी आयोजित पंचकर्म कार्यशाळेच्या निमित्ताने संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रदीप पंढरीनाथ जोशी यांचा त्यांच्या सलग ५० वर्षांच्या अखंड, अविरत, निस्वार्थ व निष्ठापूर्वक सेवेसाठी जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी संस्थेचे सरकार्यवाह डॉ. आशानंद सावंत यांच्या हस्ते श्री. जोशी यांना शाल, श्रीफळ आणि जीवनगौरव पुरस्काराचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रदीर्घ सेवेत खंबीर साथ दिल्याबद्दल सौ. प्रिती जोशी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त व प्राध्यापक डॉ. विश्वजित पाताडे, नियामक मंडळ सदस्य डॉ. राजन पाटणकर, प्राचार्य डॉ. रविदास मोरे, माजी प्राचार्य डॉ. कामत व डॉ. सातपुते, उपप्राचार्य डॉ. पाथरीकर, डॉ. शिला कोहाड, डॉ. पंकज ताथेड यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि आंतरवाशी वैद्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. हेमंत पराडकर यांनी श्री. प्रदीप जोशी यांच्या ५० वर्षांच्या सेवाकार्याचा, सामाजिक योगदानाचा, संघटनात्मक कार्याचा तसेच पत्रकारितेतील योगदानाचा आढावा घेतला. त्यानंतर श्री. जोशी यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपल्या सेवाप्रवासातील अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. पंकज ताथेड यांनी केले.


