तीन हत्ती चौक परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना कराव्यात-उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून बारामती येथील विकासकामांची पाहणी
बारामती, दि. ४: शहरातील तीन हत्ती चौक परिसरात प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करुन वाहतूक कोंडी सोडवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
श्री.पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन विभाग, बिरोबा मंदीर परिसर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ग्रंथालय इमारत, उपजिल्हा कारागृह इमारत आणि श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसरातील सुरू असलेल्या सार्वजनिक विकासकामांची पाहणी केली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, महावितरणचे मुख्य अभियंता अंकुश नाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर आदी उपस्थित होते
श्री. पवार म्हणाले, तीन हत्ती चौकात वाहतूक सोडवण्यासाठी नागरिकासाठी दिशादर्शक फलक लावावेत, चौकात पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, वाहतुकीला अडथळे निर्माण करणाऱ्या बाबी त्वरित हलविण्यात याव्या, परिसरात अतिक्रमण होणार नाही याबाबत प्रशासनाने दक्षता घ्यावी.
बारामती परिसरातील सुरू असलेली विविध सार्वजनिक विकासकामे कामे दर्जेदार पद्धतीची व गतीने पूर्ण करावीत; यापूर्वी पूर्ण झालेल्या शासकीय इमारती स्वच्छ राहतील व परिसरात अतिक्रमण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी.
कन्हेरी वनविभागात हवामानारुप वाढणाऱ्या व सावली देणाऱ्या प्रजातींचे वृक्षारोपण करा आणि ती झाडे जगली पाहिजेत, याबाबत दक्षता घ्यावी. तलावातील पाणी व परिसर स्वच्छ राहील, याची दक्षता घ्यावी. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चढ-उतार करण्यासाठी सोईस्कर पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी.
काटेवाडी येथील बिरोबा मंदिराच्या भिंतीबाहेर तिन्ही बाजूस नागरिकांना बसण्यासाठी ओटा करावा. वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांना ओट्यावर चढ-उतार करण्यासाठी पायऱ्या कराव्यात. बाजरी घडई असणाऱ्या फरश्या बसवाव्यात.परिसरात दोन लाख लिटर पाण्याची टाकी बांधावी. यात्रेदरम्यान येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात शौचालये आणि वाहनतळ उभारावे. परिसरात पाण्याचा व्यवस्थितपणे निचरा होईल, आदी बाबींचा विचार करून आराखडा तयार करा.
प्राचीन आणि आधुनिकतेचा संगम साधत श्रीमंत बाबुजी नाईक वाडा परिसर विकसित करा; कामे करतांना वाड्याचे मूळ रूप जतन झाले पाहिजे. वास्तू पूर्ण झाल्यानंतर स्वातंत्र्यपूर्व काळाची अनुभूती आली पाहिजे. खोलीत स्वच्छ सूर्यप्रकाश राहील तसेच नागरिकांच्या स्पष्ट दिसेल असे विजेचे दिवे लावावेत. दिवे लावतांना नागरिकांच्या सुरक्षितेतचाही विचार करावा. भिंती, फरश्यामधील फटी राहता कामा नये. परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करावे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाअंतर्गत ग्रंथालयाच्या इमारतीच्या सभोवतालची संरक्षण भिंत १० फूट उंच बांधावी. उपजिल्हा कारागृहाच्या इमारतीची उंची परिसरात असलेल्या रोडपेक्षा तीन फुट उंच ठेवावी जेणेकरुन भविष्यात परिसरात होणाऱ्या इमारतीमुळे कारागृह इमारतीच्या उंचीवर परिणाम होणार नाही. या सार्वजनिक कामांसाठी अत्याधुनिक दर्जाच्या साहित्याचा वापर करावा. विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशा ग्वाही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिली.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार , जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी अनिल बागल, मुख्याधिकारी महेश रोकडे, वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
पाहणी दौऱ्यानंतर येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते नगर परिषदेच्या अग्निशमन दलाकरीता हायप्रेशर वॉटर मिस्ट असलेल्या चार अग्निशमन बुलेट दुचाकी वाहनांचे सहयोग सोसायटी येथे लोकार्पण करण्यात आले. सदरची वाहने मदत व पुनर्वसन विभागाकडून प्राप्त झाली आहेत.