नमो महारोजगार मेळाव्यासाठी नावनोंदणी करण्याचे उपविभागीय वैभव नावडकर यांचे आवाहन
बारामती, दि.२७: बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आयोजित पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याकरीता आजपर्यंत ३११ आस्थापना सहभागी झाल्या असून त्यांच्याकडून ४३ हजार ६१३ रिक्तपदे कळविण्यात आली आहेत; परिसरातील अधिकाधिक युवक-युवतींनी मेळाव्यासाठी नावनोंदणी करून रोजगार संधींचा लाभ घ्यावा,असे आवाहन उपविभागीय वैभव नावडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना केले.
नमो महारोजगार मेळाव्याचे २ व ३ मार्च रोजी आयोजन
श्री. नावडकर म्हणाले, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील युवक-युवतींना रोजगार मिळवून देणाऱ्या विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळाव्यासह इतर कार्यक्रमांकरीता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्रीमहोदयांच्या प्रमुख उपस्थितीत २ व ३ मार्च रोजी बारामती येथे आयोजन करण्यात आले आहे. या महारोजगार मेळाव्यातून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार, स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
नमो महारोजगार मेळाव्यातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध
या मेळाव्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासोबतच महाविद्यालयीन विद्यालयीन विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. या मेळाव्यामध्ये रोजगार इच्छूक असणाऱ्या दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तेथेच त्यांना नियुक्ती दिली जाणार आहेत. याकरीता बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, फलटण परिसरातील महाविद्यालयांशी संपर्क करुन विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करुन या मेळाव्यात सहभागी करुन घेण्यात येत आहे.
आज पर्यंत सुमारे 14 हजार पेक्षा अधिक युवक-युवतींनी नाव नोंदणी केली आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या लिंकवर जावून नोंदणी करावी आणि नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नियोक्त्यांसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मेळाव्याच्या ठिकाणीही ऑफलाईन नोंदणी करता येणार आहे.
पुणे विभागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता त्यांना सोई-सुविधा मिळण्याकरीता नियेाजन करण्यात येत आहे. अल्पोपहार व भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी, शौचालय, बैठक व्यवस्था, वैद्यकीय पथक, कार्यक्रमस्थळी तसेच शहरात स्वच्छतेच्या सुविधा, सीसीटीव्ही, एलईडी डिस्प्ले, जनरेटर, विद्युत, वैद्यकीय पथक, सुरक्षा व्यवस्था, बंदिस्त दालन आदी सुविधेबाबत वारंवार आढावा घेण्यात येऊन संबंधितांना निर्देश देण्यात येत आहेत.
बारामती परिसरातील विविध विकासकामांचे २ मार्च उद्धाटन
बारामतीत २ मार्चला परिसरातील विविध विकास कामांचे उद्धाटन होणार आहे. बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यालयाचे उद्घाटन, पोलिसांसाठीच्या घरांचे लोकार्पण, पोलीस विभागाला देण्यात येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे लोकार्पण, सीसीटीव्ही प्रकल्पाचा शुभारंभ, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन, बारामती बसस्थानकाचे लोकार्पण आदी कार्यक्रम होणार आहेत.
या दोन दिवशी शहरात वाहतुक कोंडी टाळण्याबाबत पोलीस प्रशासन नियोजन करीत आहे. रोजगार मेळाव्याकरीता येणाऱ्या वाहनानुसार जिल्हानिहाय वाहनतळ व्यवस्था करण्यात येत आहे. त्याकरीता ठिकाण निश्चित करण्याची कार्यवाही सुरु आहे. नमो रोजगार मेळाव्याकरीता ३५० स्टॉल्स उभारण्यात येत असून त्यामध्ये विविध आस्थापना, महिला बचत गट तसेच वैद्यकीय पथके आदी स्टॉल्स असणार आहेत, अशी माहितीही यावेळी त्यांनी दिली.