बारामतीत ४ लाखांची लाच स्वीकारताना वाहतूक नियंत्रक रंगेहात जेरबंद; भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल


बारामतीत ४ लाखांची लाच स्वीकारताना वाहतूक नियंत्रक रंगेहात जेरबंद; भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बारामती, दि. २४ जुलै : प्रलंबित बिले आणि ठेव रक्कम मंजूर करून देण्यासाठी ₹६ लाखांची लाच मागून तडजोडीनंतर ₹४ लाखांची रक्कम स्वीकारताना बारामती एमआयडीसी डेपोतील वाहतूक नियंत्रक अनिल तुकाराम बनकर (वय ५१) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ (सुधारित) च्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनिल बनकर हे बारामती एमआयडीसी डेपो येथे वाहतूक नियंत्रक म्हणून कार्यरत असून स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबईचे संचालकही आहेत.

तक्रारदार यांच्या ‘जित वुडन फर्निचर’ या फर्मने बँकेच्या बारामती शाखेच्या नवीन इमारतीतील फर्निचरचे काम पूर्ण केले होते. या कामाची एकूण किंमत ₹४८.६० लाख होती. त्यापैकी ₹४० लाखांची रक्कम मिळाली होती, मात्र फर्निचरसह इतर कामांची एकूण ₹१३.५८ लाखांची बिले व ठेव रक्कम प्रलंबित होती.

आरोपीने ही रक्कम मंजूर करून देण्यासाठी सुरुवातीला ₹५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप असून, नंतर पडताळणीदरम्यान ₹६ लाखांची मागणी करून तडजोडीनंतर ₹४ लाख स्वीकारण्याचे मान्य केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले.

Advertisemen

तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्याआधारे २३ जुलै रोजी बारामती येथे सापळा रचण्यात आला.

बारामती एस.टी. बसस्थानकासमोरील बारामती–इंदापूर मार्गावर आरोपीने आपल्या इर्टिगा कारमध्ये तक्रारदाराकडून ₹४ लाखांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान ₹४ लाखांची लाचेची रक्कम, आरोपीचा मोबाईल, गुन्ह्याशी संबंधित इलेक्ट्रॉनिक पुरावे, वापरण्यात आलेले वाहन आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८८/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर करीत आहेत.

दरम्यान, तपासाच्या हितासाठी ध्वनिमुद्रित संभाषणे, पंचनामे, साक्षीदारांचे जबाब, इलेक्ट्रॉनिक पुरावे व इतर संवेदनशील तपशील जाहीर करण्यात आलेले नसल्याचे एसीबीने स्पष्ट केले आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी कायदेशीर कामासाठी लाच मागत असल्यास लाच न देता त्वरित एसीबीशी संपर्क साधावा. तक्रारदाराची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवली जाते, असेही विभागाने नमूद केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »