आरोग्यवारी अल्ट्रा रन 2026 : उद्या बारामतीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन


आरोग्यवारी अल्ट्रा रन 2026 : उद्या बारामतीत वाहतुकीत मोठे बदल; नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

बारामती, दि. २५ जुलै : लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने रविवारी (दि. २६ जुलै) “आरोग्यवारी अल्ट्रा रन – 2026” या भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी विविध मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल केले असून, बारामती शहरासह परिसरातील नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

मॅरेथॉन स्पर्धेला पहाटे ३.३० वाजता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातून सुरुवात होणार असून, वडकीनाला, दिवेघाट, सासवड, जेजुरी, मोरगाव, सुपा मार्गे धावपटू बारामतीत प्रवेश करणार आहेत. स्पर्धेचा समारोप बारामतीतील नटराज नाट्यकला मंदिर येथे होणार असून सायंकाळी ५ ते ६ या वेळेत बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे.

स्पर्धेदरम्यान मोठ्या संख्येने धावपटू, मान्यवर आणि नागरिक सहभागी होणार असल्याने सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत किंवा स्पर्धा संपेपर्यंत बारामती शहरातील विराट हॉटेल, खंडोबानगर, कसबा, गुणवडी रोड, कुडगाव चौक, निमगाव चौक, निरा रोड तसेच अन्य प्रमुख मार्गांवरील वाहतूक बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.

Advertisemen

याशिवाय जेजुरी, बेलसर, सुपा, सातारा, पुणे, बारामती, निरा आणि केंजळगाव चौफुला परिसरातील विविध मार्गांवरही वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असून वाहनचालकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मॅरेथॉन मार्गावर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेचे कर्मचारी, होमगार्ड आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच कोणतीही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदत मिळावी यासाठी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल, शासकीय आरोग्य यंत्रणा आणि १०८ रुग्णवाहिका सेवेशी समन्वय साधण्यात आला आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी नागरिक, व्यापारी आणि वाहनचालकांनी अनावश्यक वाहतूक टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे तसेच रुग्णवाहिका व इतर आपत्कालीन वाहनांना तात्काळ मार्ग द्यावा, असे आवाहन केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ पोलीस प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »