गोजूबावी फाट्यावर गावठी पिस्तूलासह तरुण अटकेत; बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई
गोजूबावी फाट्यावर गावठी पिस्तूलासह तरुण अटकेत; बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई
बारामती, दि. २१ जुलै : बारामती तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत एका २६ वर्षीय तरुणाला गावठी बनावटीच्या पिस्तूलासह आणि जिवंत काडतुसासह ताब्यात घेतले. या प्रकरणी शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोजूबावी फाटा येथे पालखी महामार्गालगत एक व्यक्ती कमरेला गावठी पिस्तूल लावून उभी असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान आरोपीकडून अंदाजे ₹५०,००० किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹५०,२०० असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी अजय नंदकुमार सकट (वय २६, रा. तांदुळवाडी, ता. बारामती) याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम, १९५९ चे कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ अंतर्गत बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पवार करीत आहेत.


