बारामतीत मोठी मुरूम चोरी! कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेतील सुमारे दोन हजार ब्रास माती-मुरूम लंपास; अज्ञातांविरुद्ध गुन्हा


बारामती, दि. २१ जुलै : बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकीच्या जागेतून बेकायदेशीरपणे मुरूम व मातीची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हौसेराव रामचंद्र कोकरे (सचिव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, झारगडवाडी येथील गट क्रमांक ४४६ मधील सुमारे ८ हेक्टर ४० आर क्षेत्र बाजार समितीच्या मालकीचे असून, तेथे बाजार आवार विकसित करण्याचे काम सुरू आहे. १३ जुलै रोजी जागेची पाहणी करत असताना मोठ्या प्रमाणात खोदकाम करून सुमारे दोन हजार ब्रास मुरूम व माती चोरीस नेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

Advertisemen

या प्रकरणात पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, खाण व खनिज (विनियमन व विकास) अधिनियम १९५७, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला असून, चोरीस गेलेल्या मुरूम व मातीचे पंचनाम्यानंतर अंतिम मूल्य निश्चित करण्यात येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »