बारामतीत दूध भेसळ प्रकरणाचा मोठा भांडाफोड! वैज्ञानिक तपासाच्या जाळ्यात संशयित; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
बारामतीत दूध भेसळ प्रकरणाचा मोठा भांडाफोड! वैज्ञानिक तपासाच्या जाळ्यात संशयित; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
बारामती, दि. १९ जुलै : बारामतीतील कथित दूध भेसळ प्रकरणाने गंभीर वळण घेतले असून, अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईनंतर आता बारामती शहर पोलिसांनी तपासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. प्रयोगशाळा अहवाल, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, CCTV फुटेज, मोबाईल डेटा आणि संपूर्ण पुरवठा साखळीची सखोल चौकशी सुरू असून, पुरावे निष्पन्न झाल्यास संबंधितांविरुद्ध कोणतीही दयामाया न दाखवता कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 278/2026 भारतीय न्याय संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 अंतर्गत दाखल करण्यात आला आहे. ५ जुलै रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत एका व्यावसायिक आस्थापनातून व्हे पावडर, स्किम्ड मिल्क पावडर (SMP) आणि व्हे परमिएट पावडर जप्त करून नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यानंतर सविस्तर फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.
तपासादरम्यान संबंधित व्यक्तींना नोटिसा बजावण्यात आल्या असून, बँक व्यवहार, GST व FSSAI नोंदी, वाहतूक कागदपत्रे, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि इतर महत्त्वाचे पुरावे पोलिसांनी मागविले आहेत. पुरवठा साखळीतील प्रत्येक व्यक्तीची भूमिका तपासली जात असून, आर्थिक व्यवहारांचाही मागोवा घेतला जात आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अन्नभेसळ हा केवळ आर्थिक गुन्हा नसून नागरिकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळणारा गंभीर अपराध आहे. त्यामुळे तपासात दोषी आढळणाऱ्या कोणालाही कायद्याची कोणतीही सवलत दिली जाणार नाही.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ, कृत्रिम दूध निर्मिती, संशयास्पद साठवणूक किंवा विक्रीबाबत माहिती असल्यास ती तातडीने बारामती शहर पोलिसांकडे किंवा अन्न सुरक्षा विभागाकडे द्यावी. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल.


