बारामतीत आई-मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; घटनेने खळबळ


बारामतीत आई-मुलाची गळफास घेऊन आत्महत्या; घटनेने खळबळ

बारामती : बारामती तालुक्यातील दादा पाटीलनगर, तांदुळवाडी येथे आई आणि अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२१ ऑगस्ट) सकाळी उघडकीस आली. या घटनेत रमा विजय गावडे (वय ४१) आणि त्यांचा मुलगा विवेक विजय गावडे (वय १७) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रमा गावडे आणि विवेक गावडे हे दादा पाटीलनगर, तांदुळवाडी येथे राहत होते. विवेकचे वडील विजय गावडे हे २० ऑगस्ट रोजी रात्री कंपनीत ड्युटीवर गेले होते. २१ ऑगस्ट रोजी सकाळी ते घरी परतले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

दरवाजा उघडण्यासाठी त्यांनी शेजाऱ्यांची मदत घेतली. घरातील खिडकीतून पाहिले असता विवेक याने पत्र्याच्या अँगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याच परिसरात रमा गावडे या बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्या. त्यांच्या गळ्यावरही काळसर व्रण दिसून आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Advertisemen

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना उपचारासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, बारामती येथे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून दोघांनाही उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची नोंद बारामती तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे. आई आणि मुलाने आत्महत्या का केली, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम तसेच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुधीर काळे पुढील तपास करत आहेत.

आई आणि मुलाच्या या दुर्दैवी मृत्यूने तांदुळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या घटनेमागील नेमके कारण तपासातून समोर येणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »