दक्ष नागरिक आणि पोलिसांची तत्परता; बारामतीत जुन्या रेल्वे पुलाखाली आढळलेल्या नवजात बालिकेचे वाचले प्राण


दक्ष नागरिक आणि पोलिसांची तत्परता; बारामतीत जुन्या रेल्वे पुलाखाली आढळलेल्या नवजात बालिकेचे वाचले प्राण

बारामती (विशेष प्रतिनिधी): नागरिकांची सतर्कता आणि पोलिसांच्या वेगवान हालचालींमुळे बारामती परिसरातील तांदूळवाडी येथे एका नवजात मुलीचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. जुन्या रेल्वे पुलाखाली बेवारस स्थितीत टाकून दिलेल्या या बालिकेला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल करून वेळीच वैद्यकीय उपचार मिळवून दिले.

नेमकी घटना काय? बुधवारी सकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास तांदूळवाडी येथील जुन्या रेल्वे पुलाखाली नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज एका दक्ष नागरिकाला ऐकू आला. पुलाखाली नवजात बालिका असल्याचे लक्षात येताच संबंधित नागरिकाने क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

Advertisemen

पोलिसांची तत्पर कारवाई नागरिकाचा फोन येताच पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी ११२ क्रमांकाच्या ड्युटीवर तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल शाहरुख शेख यांना तात्काळ घटनास्थळी धाव घेण्याचे निर्देश दिले. यानंतर पोलीस निरीक्षक नारायण पवार, पीएसआय अमोल कदम आणि कॉन्स्टेबल शाहरुख शेख यांनी घटनास्थळ गाठले. तेथील एका जागरूक नागरिकाने बाळाला आधीच सुरक्षित उचलून मदत करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. पोलिसांनी तातडीने बाळाला ताब्यात घेऊन बारामती येथील आरोग्य महिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मुलीची प्रकृती स्थिर; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने तात्काळ उपचार सुरू केले असून नवजात मुलगी उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहे व तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, नवजात मुलीचा जीव धोक्यात घालून तिला सोडून दिल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शाहरुख शेख यांच्या फिर्यादीवरून बारामती पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल भोसले करत आहेत.

वेळेवर माहिती देणाऱ्या दक्ष नागरिकाचे आणि तत्परतेने पावले उचलणाऱ्या बारामती पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »