वडगाव निंबाळकर येथे बेफिकीरपणे वाहन चालविल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
बारामती: वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथे एसटी स्टँडसमोरील मोकळ्या जागेत महिंद्रा बोलेरो गाडीवर स्टंटबाजी करून निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५, ३(५) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या बाबत पोलीस शिपाई आबा विलास जाधव ( वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार, ९ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजण्यापूर्वी ही घटना घडली. आरोपी सुजल कैलास आगम (रा. वडगाव निंबाळकर), यश भानुदास दरेकर (रा. वडगाव निंबाळकर), किशोर उर्फ भावड्या हरिभाऊ आगम (रा. वडगाव निंबाळकर) आणि ओंकार राजेंद्र दरेकर (रा. वडगाव निंबाळकर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
यातील मुख्य आरोपी सुजल कैलास आगम हा त्याच्या ताब्यातील एमएच ४२ बीएन १२७४ क्रमांकाची महिंद्रा बोलेरो गाडी चालवत होता. त्याने गाडीच्या टपावर आरोपी यश दरेकर याला बसवले होते, तर बॉनेटच्या डाव्या बाजूला किशोर उर्फ भावड्या आगम आणि उजव्या बाजूला ओंकार दरेकर यांना उभे केले होते. अशा धोकादायक पद्धतीने आणि बेफिकीरपणे वाहन चालवून त्यांनी स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताला धोका निर्माण केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेची नोंद वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस हवालदार चौधरी यांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पन्हाळे करत आहेत. या गुन्ह्याच्या वर्दीचा अहवाल माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो. बारामती यांच्या न्यायालयात पाठवण्याची तयारी सुरू आहे.