बारामती येथे राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न


निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, निर्भयपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न- उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर

बारामती दि.२५: निवडणूक प्रक्रिया नि:पक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन नेहमीच प्रयत्नशील असते, असे प्रतिपादन उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

कवी मोरोपंत सभागृह येथे आयोजित या कार्यक्रमास तहसीलदार गणेश शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, निवासी नायब तहसीलदार विलास करे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, ‘स्वीप’ नोडल अधिकारी तथा गट शिक्षण अधिकारी संपत गावडे आदी उपस्थित होते.

श्री. नावडकर म्हणाले, भारत निवडणूक आयोगाकडून मतदान प्रक्रियेत कालांतराने विविध सुधारणा होत असून त्यानुसार प्रशासन काम करीत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीचे शुद्धीकरण करुन ती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीमध्ये नवीन मतदार नोंदणी, मयत नागरिकांची नावे वगळणे, स्थलांतरित मतदारांची नावे संबंधित मतदार संघात स्थलांतरित करणे अशा विविध प्रक्रिया प्रशासनाच्यावतीने पार पाडण्यात आल्या आहेत.

मतदार प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांना सहभागी होता यावे, मतदानाची टक्केवारी वाढावी, मतदान प्रक्रिया सुलभ होऊन मतदानाचा हक्क बजावता यावा, मतदानापासून मतदार वंचित राहू नये याकरीता भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदानाच्यावेळी विविध सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

Advertisemen

८० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी टपाली मत पत्रिकेची सोय, महिला मतदारांच्या बाळासाठी पाळणाघर, दिव्यांग मतदारासाठी आवश्यक साधने, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यासाठी टपाली मत पत्रिकेची सोय आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रियेच्यावेळी या सुविधेचा लाभ घेऊन मतदान करावे, असे आवाहन श्री. नावडकर यांनी केले.

 

श्री. इंगळे म्हणाले, संसदीय प्रकारच्या भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया महत्वाची बाब मानली जाते. लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक युवा मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे. युवकांनी समाज व कुटुंबातील पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जागृत करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात १० मतदारांना नवीन मतदान कार्डचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शिंदे यांनी केले तर नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांनी आभार मानले.

यावेळी मतदान प्रक्रियेबाबत जनजागृती करण्यासाठी चित्ररथ आणि सायकल फेरीचे प्रशासकीय भवन येथून शुभारंभ करण्यात आला. बारामती बस स्थानक, इंदापूर चौक, गांधी चौक, भिगवण चौक मार्गे कवी मोरोपंत सभागृह येथे समारोप करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »