बारामतीतील धक्कादायक घटना! वीजबिलाच्या तक्रारीची दखल घेतली नाही, महावितरण महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयत्याने वार, महिलेचा मृत्यू


बारामती : बारामती तालुक्यातील मोरगाव येथे महावितरण कंपनी कार्यालयात एका महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने येथील महिला कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. वीजबिल जास्त येत आहे, त्यामुळे मीटर चेक करावा अशी वारंवार तक्रार महावितरणकडे या आरोपीने केली होती. मात्र, महावितरणने कोणतीही कार्यवाही न केल्याने अभिजीत पोटे याने महिला कर्मचाऱ्यांच्या डोक्यात कोयता मारला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोयत्याचा गंभीर वार बसल्याने उपचारादरम्यान, महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बारामतीमधील घटनेनंतर महिलेला उपचारासाठी पुण्याला नेण्यात येत होते. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला असल्याचे समजते.

Advertisemen

बारामती महावितरण विभागातील घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव रिंकू पिटे असे आहे. या घटनेनंतर सदर महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिलेला पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले. मात्र, पुण्यात उपचारादरम्यान, महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी बारामतीतील सुपे पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती होती. पण, महिलेचा मृत्यू झाल्यामुळे आता याप्रकरणी 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. दुचाकीवरुन आलेल्या इसमाने टोकाची भूमिका घेत थेट महिला कर्मचाऱ्याच्या डोक्यात कोयताच घातल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी कसून तपास करावा अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »