भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवरील दुष्ट हेतूने लावलेले होर्डिंग आणि स्टेडियम शेजारी राहणाऱ्या बहुसंख्य अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या घरचा विद्युत पुरवठा खंडित केल्याबद्दल ठेकेदारावर गुन्हा दाखल करून त्यासोबत झालेला करार रद्द करण्याची मागणी!
बारामती: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या देखभालीवरून बारामतीत नवा वाद निर्माण झाला आहे. स्टेडियम देखभाल दुरुस्तीसाठी आणि क्रिकेट अकादमी चालवण्यासाठी धो.आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. मात्र, या ठेकेदाराने स्टेडियमच्या दर्शनी भागात “कारभारी जिमखाना” नावाचे मोठे होर्डिंग्ज लावले आहे. हे होर्डिंग्ज महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव कमी लेखण्याच्या जातीवादी हेतूने लावल्याचा आरोप स्थानिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि नागरिकांनी केला आहे.
या होर्डिंग्जमुळे स्थानिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. बारामती नगर परिषदेची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता आणि करारातील अटी आणि नियमांचे उल्लंघन करून हे होर्डिंग्ज लावण्यात आले आहे, असा आरोप आहे. त्यामुळे हे होर्डिंग्ज तातडीने काढून टाकावेत आणि धो.आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनच्या चालक – मालकांवर सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच, स्टेडियम शेजारी राहणाऱ्या बहुसंख्य अनुसूचित जातीच्या नागरिकांना ज्या विद्युत वाहिनीमधून वीज पुरवठा केला जातो ती विद्युत वाहिनी देखील याच ठेकेदाराच्या अशास्त्रीय कामाच्या पद्धतीमुळे तुटल्याने स्टेडियम शेजारी राहणाऱ्या बहुसंख्य अनुसूचित जातीतील नागरिकांच्या घरातील वीज पुरवठा दि. 28/2/2025 रोजी स. 11 वा. पासून ते दि. 01/03/2025 रोजी दु. 1 वा. पर्यंत साधारणतः 24 तासांपेक्षा अधिक काळ खंडित झाला. त्यामुळे करारातील नियम आणि अटींचे उल्लंघन करणाऱ्या तसेच कायदा न मानणाऱ्या धो. आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनचे चालक मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यासोबत झालेला करार रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा स्वरूपाचे लेखी निवेदन मा. महेश रोकडे साहेब (मुख्याधिकारी बा.न. प) आणि मा. विलास नाळे साहेब (पोलीस निरीक्षक बारामती शहर) यांना देण्यात आले.
यावेळी मा. रविंद्र (पप्पू) सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI आठवले), मा. अभिजित कांबळे (शहर अध्यक्ष RPI आठवले), मा. अँड. अक्षय गायकवाड (भाजपा), मा. अमर भंडारे, मा. गणेश जाधव, मा. मोहन शिंदे, मा. सुमित सोनवणे, मा. इंद्रजित साळवे, मा. सूरज मोरे, मा. सचिन शिंदे, मा. निलेश शेंडगे, मा. विनोद काळे, मा. किरण नागे आदी स्थानिक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.