अंगणवाडीच्या पोषण आहारात मोठा बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव, मल्टीग्रेन न्युट्री पफ
अंगणवाडीच्या पोषण आहारात मोठा बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव, मल्टीग्रेन न्युट्री पफ
पुणे, दि. २१ : महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीच्या घरपोच पोषण आहार योजनेत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२६ पासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ४ हजार ३९५ अंगणवाड्यांमधील लाभार्थ्यांना सुधारित पोषण आहार उपलब्ध करून दिला जाणार आहे. बालके, गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अधिक पौष्टिक, चविष्ट व दर्जेदार आहार मिळावा, यासाठी शाकाहारी (व्हेज) पुलाव, मल्टीग्रेन न्युट्री पफ आणि खिचडीसाठी स्वतंत्र मसाल्याचे पाकीट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिली जाणारी मूगडाळ खिचडी प्रीमिक्स कायम ठेवण्यात आली असून, त्यासोबत स्वतंत्र मसाल्याचे पाकीट दिले जाईल. मात्र, तूरडाळ खिचडी प्रीमिक्सच्या जागी आता व्हेज पुलाव देण्यात येणार आहे. तसेच भरडधान्ययुक्त बहुधान्य-प्रथिन मिश्रणाऐवजी बहुधान्य पौष्टिक पफचा समावेश करण्यात आला आहे.
या बदलामागील उद्देश लाभार्थ्यांना अधिक पौष्टिक, रुचकर आणि सहज स्वीकारार्ह आहार उपलब्ध करून देणे हा आहे. विशेषतः बालके, गरोदर महिला आणि स्तनदा माता पोषण आहार आवडीने सेवन करतील, यासाठी या नवीन खाद्यपदार्थांचा समावेश करण्यात आला आहे.
महिला व बालविकास समितीच्या सभापती अंकिता पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ४ हजार ३९५ अंगणवाड्या कार्यरत असून, त्यामार्फत सुमारे १ लाख ६ हजार बालके, तसेच गरोदर महिला आणि स्तनदा मातांना घरपोच पोषण आहाराचा लाभ दिला जातो. नोव्हेंबर-डिसेंबर २०२६ पासून सुधारित खाद्यसूचीनुसार सर्व अंगणवाड्यांमध्ये नवीन पोषण आहाराचा पुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे.


