पोलिसांची कारवाई झाली, तरी भवानीनगरमधील जुगार अड्डा सुरूच? वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
पोलिसांची कारवाई झाली, तरी भवानीनगरमधील जुगार अड्डा सुरूच? वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह!
कारवाईनंतरही जुगार सुरू असल्याचा आरोप; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी
भवानीनगर | प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील भवानीनगर परिसरात बेकायदा जुगार सुरू असल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापूर्वी जुगारावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या कारवाईनंतरही संबंधित ठिकाणी आजही जुगार सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३४८/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ च्या कलम १२(अ) नुसार पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, पत्त्यांचे कॅट, वही आणि पेन असा मुद्देमाल जप्त केला होता.
मात्र, पोलिसांच्या कारवाईनंतरही भवानीनगर परिसरातील कथित जुगार अड्डा सुरूच असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेली कारवाई नेमकी कितपत प्रभावी ठरली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कारवाईनंतरही जुगार सुरू असल्यास पोलिसांचे अभय कोणाचे?
एखाद्या ठिकाणी जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस कारवाई करतात; मात्र त्याच ठिकाणी पुन्हा जुगार सुरू राहत असल्यास अशा प्रकारांना आळा कसा बसणार? जुगार चालवणाऱ्यांवर सातत्याने कारवाई का होत नाही? संबंधित अड्ड्याला कोणाचे अभय आहे का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन भवानीनगर परिसरातील कथित जुगार अड्ड्याची प्रत्यक्ष तपासणी करावी, तसेच जुगार सुरू असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
आता वालचंदनगर पोलीस प्रशासन या प्रकाराची दखल घेऊन ठोस कारवाई करणार का, की कारवाईनंतरही जुगाराचे अड्डे असेच सुरू राहणार? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बारामती संचार – लोकहिताचा विचार!

