पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचे तालुका कृषी अधिकाऱ्याचे आवाहन
बारामती, दि.12 : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी स्वतःकडे उपलब्ध असलेल्या मका, कांदा, सोयाबीन, तूर, मूग आदी पिकांच्या बियाण्यांची उगवण क्षमता तपासून घेवूनच पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले आहे.
घरच्या घरी साध्या पद्धतीने १०० बियाणे ओल्या कापडात किंवा कागदात ठेवून सावलीत ठेवावीत. आवश्यकतेनुसार ओलावा कायम राखावा. पिकानुसार ५ ते १० दिवसांनंतर उगवलेल्या बियाण्यांची संख्या मोजून उगवण टक्केवारी निश्चित करता येते. उदाहरणार्थ, १०० पैकी ७५ बियाणे उगवली असल्यास उगवण क्षमता ७५ टक्के समजावी.
उगवण क्षमता शिफारशीनुसार असल्यासच ती बियाणे पेरणीसाठी वापरावीत. उगवण क्षमता कमी असल्यास बियाण्यांचे प्रमाण वाढविणे किंवा प्रमाणित बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करणे आवश्यक आहे. खरेदी केलेल्या बियाण्यांचे पक्के बिल जतन करून ठेवण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. पेरणीपूर्वी उगवण क्षमता तपासून दर्जेदार बियाण्यांचा वापर केल्यास अपेक्षित रोपसंख्या मिळून उत्पादनवाढीस मदत होणार असल्याचे श्री. हाके यांनी कळविले आहे.


