बारामतीत परवान्याशिवाय फटाक्यांची वाहतूक; 7.79 लाखांचा मुद्देमाल जप्त


बारामती, दि. 17 जून – बारामती शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत परवान्याशिवाय फटाक्यांची वाहतूक करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकूण 7 लाख 79 हजार 628 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बारामती शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 240/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 125, 287 तसेच मोटार वाहन कायदा कलम 66, 192 आणि 190(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार वैभव भगवान साळवे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 जून 2026 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मौजे मळद (ता. बारामती) येथील फलटण-बारामती रोडवरील चिंचबन परिसरात चार वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी संबंधित वाहनांमधून विविध प्रकारचे फटाके आढळून आले.

Advertisemen


या प्रकरणात सोमनाथ सदाशिव होले (रा. खंडोबानगर, बारामती), संदीप युवराज नेटके (रा. साठेनगर, कसबा बारामती), गणेश बाबासाहेब गरगडे (रा. गुणवरे, ता. फलटण, जि. सातारा) आणि सुरेश बापूराव गवारे (रा. देसाई इस्टेट, बारामती) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान दोन तीनचाकी पेंजो वाहने, एक महिंद्रा व्हिरो आणि एक अशोक लेलँड छोटा हत्ती वाहन यामधून विविध प्रकारचे फटाके जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालामध्ये वाहनांसह 1 लाख 79 हजार 628 रुपयांचे फटाके आणि वाहने मिळून एकूण 7 लाख 79 हजार 628 रुपयांचा माल समाविष्ट आहे.
पोलिसांच्या तपासात संबंधितांकडे स्फोटक पदार्थांची वाहतूक अथवा साठवणूक करण्यासाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना नसल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत. दाखल अंमलदार म्हणून मपोहवा पवार (ब. नं. 2025) यांनी कामकाज पाहिले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »