महिला नेतृत्वाचा अपमान झाल्याचा आरोप; काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आज पुण्यात निषेध आंदोलन


महिला नेतृत्वाचा अपमान झाल्याचा आरोप; काँग्रेसविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आज पुण्यात निषेध आंदोलन

पुणे, दि. ४ ऑगस्ट : महिला नेतृत्वाचा अपमान करणारे वक्तव्य काँग्रेस पक्षाकडून करण्यात आल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पुणे शहराच्या वतीने आज (मंगळवार) दुपारी ४.३० वाजता जाहीर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

हे आंदोलन बालगंधर्व चौक, झाशीची राणी पुतळ्यासमोर, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे होणार असून, पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisemen

पक्षाने प्रसिद्ध केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशात आणि महाराष्ट्रात महिला नेतृत्वाची समृद्ध परंपरा राहिली आहे. काँग्रेसच्या सत्ताकाळातही अनेक महिलांनी देश व राज्याचे नेतृत्व केले असून, आजही विविध स्तरांवर महिला नेतृत्व करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर महिला नेतृत्वाबाबत करण्यात आलेले कथित अपमानास्पद वक्तव्य निषेधार्ह असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

या आंदोलनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराचे शहराध्यक्ष सुनिल टिंगरे आणि सुभाष जगताप, तसेच कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, रुपाली पाटील ठोंबरे, अक्रूर कुदळे आणि हाजी फिरोज शेख यांनी सर्व खासदार, आमदार, माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, विविध सेलचे अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांना वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून याबाबत काय भूमिका मांडली जाते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »