काटेवाडीतील जुगार अड्ड्यावर छापा; पण अड्ड्याचा खरा मालक कोण?
काटेवाडीतील जुगार अड्ड्यावर छापा; पण अड्ड्याचा खरा मालक कोण?
बारामती, दि. २९ : बारामती तालुका पोलिसांनी काटेवाडी येथे सुरू असलेल्या कथित “तेरा पानी रम्मी” जुगार अड्ड्यावर धाड टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून रोख रक्कम, मोबाईल, चारचाकी, दुचाकीसह तब्बल ₹८.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे स्वागत होत असतानाच, या प्रकरणातील काही महत्त्वाचे प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित असल्याने तपासाच्या दिशेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
एफआयआरनुसार हा जुगार अड्डा प्रकाश टेंगले यांच्या शेतामागील झोपडीत सुरू होता. त्यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की, ही झोपडी नेमकी कोणाच्या मालकीची आहे? त्या जागेचा वापर जुगारासाठी कोणाच्या परवानगीने झाला? आणि त्या जागेच्या मालकाची अथवा संबंधित व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली आहे का?
स्थानिकांच्या मते, अशा प्रकारचा जुगार अड्डा एका दिवसात सुरू होत नाही. त्यासाठी जागा, व्यवस्था, आर्थिक व्यवहार आणि नियमित ये-जा आवश्यक असते. त्यामुळे या अड्ड्यामागे केवळ जुगार खेळणारेच नव्हे, तर मुख्य आयोजक, आर्थिक लाभार्थी आणि जागा उपलब्ध करून देणारे कोण आहेत, याचाही सखोल तपास होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
एफआयआरमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी एका व्यक्तीने जुगार खेळवित असल्याचा उल्लेख आहे. मात्र, या संपूर्ण जुगार अड्ड्याचा खरा सूत्रधार कोण? अड्डा चालविण्यासाठी जागा कोणी उपलब्ध करून दिली? या प्रकारातून आर्थिक फायदा कोणाला होत होता? या प्रश्नांची उत्तरे अद्याप समोर आलेली नाहीत.
नागरिकांचे थेट प्रश्न
- जुगार अड्डा ज्या झोपडीत सुरू होता, त्या जागेचा वास्तविक मालक कोण?
- त्या जागेच्या मालकाची किंवा संबंधित व्यक्तींची चौकशी झाली आहे का?
- जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई झाली; पण अड्डा चालविणाऱ्या मुख्य सूत्रधारांवर कारवाई कधी?
- या अड्ड्याला स्थानिक पातळीवर कोणाचे संरक्षण होते का?
- अशा प्रकारचे जुगार अड्डे यापूर्वीही येथे सुरू होते का? असल्यास त्यांच्यावर काय कारवाई झाली?
बारामतीकरांची अपेक्षा स्पष्ट आहे. कारवाई केवळ जुगार खेळणाऱ्यांपुरती मर्यादित न राहता, अड्डा उभा करणारे, जागा उपलब्ध करून देणारे, आर्थिक लाभ घेणारे आणि संपूर्ण रॅकेट चालविणारे सर्व संबंधित तपासाच्या कक्षेत आले, तरच ही कारवाई खऱ्या अर्थाने प्रभावी ठरेल.


