बारामती पंचायत समितीसमोर ‘आभाळाएवढे’ आव्हाने!
बारामती : बारामती तालुका हा विकसित तालुका म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होत असताना बारामती तालुका ग्रामीणचा कणा असणारी पंचायत समिती विकलांग झाली आहे काय? असा प्रश्न जनसामान्यांच्या मनामध्ये पडला आहे. राजकीय दलालांच्या व आर्थिक दलालांच्या मगर मिठीत अडकलेले बारामती पंचायत समिती कार्यालय सोडवण्याचे आव्हान नव्याने रुजू झालेल्या (BDO) गटविकास अधिकाऱ्यांसमोर आहे. अर्थपूर्ण संबंध व राजकीय दंडेलशाहीने बारामती मध्ये बदल्या करून घेतलेले कर्मचारी राजकीय पक्षाचे नातेवाईक असल्याने कायदा न जुमानणारे आहेत. आर्थिक हितसंबंधाच्या जोरावर नियमबाह्य कामे मार्गी लावून राजकीय हितसंबंध जोपासले जातात. कार्यालयातील अनुपस्थिती ही गंभीर समस्या असून वरिष्ठांच्या आदेशांना केराची टोपली दाखवणारी मनोवृत्ती ही बारामती पंचायत समिती कर्मचाऱ्यांचा मूळ स्वभाव, कित्येक ग्रामसेवक कामाच्या ठिकाणी आठ आठ दिवस हजरच नसतात. ग्रामपंचायत कार्यालय शिपायाच्या जीवावर चालू असून कामाच्या नावावर ग्रामसेवक बांधकाम व्यवसायिक जमीन खरेदी विक्री व्यवसायामध्ये गुंतले आहेत. अशा ग्रामसेवकांचे कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कशी विकास करणार.. पंचायत समितीचे कर्मचाऱ्यांची कमतरता व फाईल दिरंगाई ही बारामती विकास मॉडेलचं आदर्श उदाहरण आहे. “पंचायत समितीतलं काम आणि वर्षभर थांब” या म्हणीप्रमाणे बारामती पंचायत समिती नुसती विकलांग नाहीतर आंधळी, मुखी, बहिरी पण आहे.
तक्रार कुणी ऐकत नाही, काम कोणाला समजत नाही, तक्रारीतलं मर्म कोणाला दिसत नाही, कारवाईसाठी पेनमध्ये शाई नाही, इथे सुनावणी ही नाही आणि विकासही नाही..!
आता नव्याने आलेले गटविकास अधिकारी हे नियमित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून निश्चित आले नसतील. बारामती मध्ये येणाऱ्या अधिकाऱ्याला अनेक दिव्यातून ही कमाईची जागा अनेक स्पर्धेतून अडथळे दूर करून राजकीय आशीर्वादातूनच मिळवावी लागते. इच्छाशक्ती असूनही देव बापाच्या आदेशाशिवाय येथे एकही कागद हालत नाही. राजकीय आशीर्वादाने बारामतीत काम करण्यासाठी नव्याने दाखल झालेले नव्या उमेदीचे नवखे गटविकास अधिकाऱ्यांना बारामती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शरद पवार गट यांच्या बारामतीत हार्दिक स्वागत व आभाळा एवढ्या शुभेच्छा..!