प्रभाग रचना विरोधात बारामतीत सर्वपक्षीय बैठक: जनआंदोलनाची तयारी


बारामती : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर, बारामती शहर आणि तालुक्यात नव्याने करण्यात येत असलेल्या प्रभाग रचनेविरोधात आज (बुधवार, ४ जून २०२४ रोजी) पाठबंधारे गेस्ट हाऊस येथे सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली. प्रस्थापित राजकारण्यांच्या दबावाखाली येऊन बेकायदेशीरपणे प्रभाग रचना केली जात असल्याचा आरोप करत, याविरोधात तीव्र जनआंदोलन उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीत उपस्थित सर्व पक्षांनी एकमताने चुकीच्या प्रभाग रचनेला तीव्र विरोध करत तक्रार/हरकत दाखल करण्याचा निर्णय घेतला. प्रभाग रचना ही लोकप्रतिनिधींच्या सोयीसाठी नसून, जनतेच्या हितासाठी असावी, असे स्पष्ट करत, सध्याची प्रभाग रचना अन्यायकारक आणि पक्षपाती असल्याचा सूर उमटला. त्यामुळे जुनी रचना तात्काळ रद्द करून नव्याने, न्याय्य पद्धतीने प्रभाग रचना करण्याची मागणी करण्यात आली.

 

प्रभाग रचनेतील आक्षेपाचे मुद्दे:

Advertisemen
  • बेकायदेशीर प्रभाग रचना: प्रस्थापित राजकारण्यांच्या दबावाखाली येऊन विरोधक निवडून येणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे.

  •  नैसर्गिक सीमेचे उल्लंघन: नैसर्गिक सीमांचे पालन केले जात नाही, प्रभाग फोडली जात आहेत.

  • समुदायांची जोडणी: ज्या समुदायाचा प्रभाग आहे, त्या समुदायाचा प्रभाग न ठेवता इतर समुदाय त्यामध्ये जोडले जात आहेत.

  • मतदार संख्येतील असमानता: प्रभागांमध्ये मतदारांची एकसारखी संख्या ठेवली जात नाही.

  • भौगोलिक अडथळे: नदी, रस्ते, रेल्वे लाईन, ओढे, नाले यांना क्रॉस करून प्रभाग बनवले जात आहेत.

पुढील आंदोलनाची रणनीती:
सर्वपक्षीय बैठकीत पुढील आंदोलनाची रणनीतीही ठरवण्यात आली. यामध्ये नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबवणे, विविध प्रभागांमध्ये बैठका व सभा घेणे, पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट करणे, निवेदनाद्वारे प्रशासकीय पातळीवर हरकत नोंदवणे आणि आवश्यकतेनुसार न्यायालयात याचिका दाखल करणे या टप्प्यांवर एकसंघपणे लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) चे ऍड. संदीप विनोदकुमार गुजर, ऍड. एस.एन. बापू जगताप, ऍड. पोपटराव सूर्यवंशी, ऍड. निलेश वाबळे, श्री. सत्यव्रत अर्जुनराव काळे; भाजपचे यशपाल भोसले ऍड. नितीन भामे, विरोधी पक्षनेते सुनील सस्ते; मनसेचे ऍड. सुधीर पाटसकर; बसपाचे काळूराम चौधरी; वंचित बहुजन आघाडीचे मंगलदास निकाळजे; शिवसेना (ठाकरे गट) चे ऍड. राहुल शिंदे; आरपीआयचे रविंद्र सोनवणे, संजय वाघमारे; एमआयएमचे फैय्याज शेख; काँग्रेसचे वीरधवल गाडे; रासपचे ऍड. अमोल सातकर; शिवसेना (शिंदे गट) चे सुरेंद्र जेवरे आदी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडणुकीसंदर्भात होत असलेली ही एकतर्फी कारवाई थांबवण्यासाठी आता जनआंदोलन छेडण्याचा निर्धार सर्वपक्षीय नेतृत्वाने व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »