संपादकीय; बारामती सी.ओ
बारामती
C.O
यांसी…
साहेब तुम्ही बारामती नगरपरिषद मध्ये मुख्याधिकारी म्हणून रुजू झाला. तेव्हा मला एक सुविचार आठवला होता एक “चांगला प्रशासक एक चांगला माणूस असतोच असं नाही” आपल्या रुजू होण्याने आपण बारामतीत येण्यापूर्वीच आपली ख्याती समाज माध्यमांमध्ये दुमदुमू लागली. नालासोपाराचे कोरोना काळातील एक चित्रपट बारामतीच्या गल्लीबोळात चर्चेला जावू लागली. आणि म्हटलं कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लोकांच्या आरोग्यासाठी आपला सर्वस्व पणाला लावणारा हा अधिकारी आहे. कर्तव्यासाठी कुठल्याही थराला जाऊन कर्तव्य बजावण्याची उर्मी या अधिकाऱ्यांमध्ये निश्चित दिसत आहे. बारामतीच्या विकासाचा हा भीम पर्वत उंचावण्याचे सामर्थ्य या अधिकाऱ्यांमध्ये आहे. आणि तुमच्या प्रेमापोटी मला काळजी वाटू लागली. काडीमोडीच्या पायावर उभं असलेलं हे बारामतीचे वैभव तुम्ही टाळी वाजवून पाडणार तर नाही ना? की या साठ वर्ष सासलेल्या कुचकामी विकासाच्या बिगाराखाली तुम्ही गाडून तर जाणार नाही ना?
या दिखाऊ साम्राज्याचे तुम्ही वास्तविक नंदनवन बनविण्याच्या प्रयत्नात येतील सडकी नासकी जातीवादी धर्महाटवादी मानसिकता आपल्यासारख्या चांगल्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा बळी तर घेणार नाही ना?
थोडक्यात रस्त्याच्या सुशोभीकरणांमध्ये रस्त्याची रुंदीकरण करणे, वाहतूक सुसज्ज करण्यासाठी तिकडंम् पूल बांधणे, वाहन तळाशिवाय भल्या मोठ्या व्यापार संकुल उभारणे, वाहनांशिवाय वाहन तळाची निर्मिती करणे, वृक्षांशिवाय बारामतीची निर्माण करणे, मानवी शरीराला मनाला आरोग्यदायी अल्हाददायी वातावरणाशिवाय दूषित वातावरण सवय बारामतीकरांना लावणे, व्यापाराच्या नावावरती बारामतीचे वैभव नष्ट करणे, नियोजन शून्य बारामतीचा आराखडा तयार करून पुढच्या पिढीला बकाल बारामती देण्याचा षडयंत्र गेले साठ वर्ष बारामती मध्ये चालू आहे.
आज जी बारामती शेजारच्या खेड्यापाड्याने वस्ती वाड्याने बनली आहे. त्या बारामतीत एकही दाखवायला नैसर्गिक सांडपाणी व्यवस्था नसणार आहे. ओढा नाले तलाव या गोष्टी पुढील पिढीला माहीतच नसतील बारामतीतून कऱ्हा नदी वाहत होती ही गोष्ट पुस्तकात वाचली जाईल. अशी अवस्था बारामतीची असून ती बदलण्याचे धाडस आपण करत आहात याबद्दल आपले किती कौतुक करावे शब्द नाहीत.
बारामतीतील वाहतूक व्यवस्था बारामतीचे विद्रुपीकरण हे बारामतीतील पथविक्रेते करत आहेत असा मंगळावरील शोध बारामतीत लावलाय आणि या शोधाच्या अंमलबजावणीसाठी बारामती मध्ये सर्व नगरपालिका कर्मचारी, पोलीस अधिकारी, ठेकेदार कर्मचारी या कामासाठी जोर बैठका मारून दंड थोपटून उभे राहिले आहेत.
शे दोनशे रुपयांच्या फळविक्रेत्याला दिवसाला शे दोनशे मिळतात. त्यात बायका पोरं कच्चे बच्चे एक वेळेस अन्न खातात. लय पिकलेली सडकी कीडकी फळं खाऊन रात्रचा दिवस उजाडतात. असं आयुष्य जगणाऱ्या काबाडकष्ट उपसून रोजचं मड खांद्यावर घेऊन पहाटे पाच वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत पायाचे गोळे मेंदूत जातात तेव्हा माझा एक दिवस कंठतो बेंबीच्या देठापासून ओरडताना रक्त वाऱ्यासारखं हवेत उडून जातं तेव्हा माझा एक दिवस कंठतो अशा जीवन जगण्याला जगणं म्हणायचं की मरण यातना आणि साहेब आता तुमच्यामुळे गेले पंधरा दिवस मी माझे कच्चेबच्चे घेऊन रोज नमाजीच्या वेळेला मशिदीसमोर भीक मागतोय तुमच्या विकृत विकासापायी मला अन्न मुश्कील झालं आहे.
साहेब विकासाने माणसं समृद्ध होतात आम्ही कंगाल झालो आहोत जो विकास मानवी संस्कृतीच्या परंपरेला मातीत गाडणारा आहे तो विकास मला आणि माझ्या वारसांना काय कामाचा
ज्यांनी या गावचे नदी नाले ओढे रस्ते गिळंकृत केले आहे. ज्यांनी शास्त्रशून्य विचाराने व आदेशाने बारामती बकाल केली आहे. अशा बकाल बारामतीचं नैसर्गिक रुपडं तुम्ही जर बहाल करणार असाल तर आमच्या तुम्हाला पिढ्यांना पिढ्याच्या हृदयापासून मनापासून शुभेच्छा.. आमच्या कबरीवर आमच्या लेकरा बाळांच्या बायका पोरांच्या भुकेल्या आत्म्यांना या बारामतीत मुक्त संचार करण्याची मुभा द्या भटकू द्या या आसमंतांमध्ये जिथे माझ्या बापजाद्यानी पोत्यावर बसून उन्हातानात इथल्या शेतकऱ्यांचा भाजीपाला शेतमाल विकला आहे. पोतंभर पैसे मिळवून त्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला देऊन त्यांना इमल्या गाड्या दिलेल्या आहेत. या बारामतीच्या वैभवशाली परंपरेला आम्ही समृद्ध केले आहे. आणि अशा समृद्ध बारामती मध्ये माझ्या पूर्वजांचे आत्मे अन्न पाण्यावाचून तडपताना पाहू दे त्यांना या पद्मश्री कृषी तज्ञ कै. आप्पासाहेब पवार, कै.अनंतराव पवार, जाणते राजे शरदचंद्रजी पवार साहेब, कार्यसम्राट अजितदादा पवार, संसदरत्न सौ. सुप्रियाताई सुळे, जगाला कृषीचे औद्योगीकरण शिकवणारे राजेंद्र साहेब पवार, कृषी उद्योजक आमदार रोहित दादा पवार, कापड उद्योग साम्राद्यानी खासदार सुमित्रा वहिनी पवार, पार्थ दादा, जय दादा, युगेंद्र दादा अशा पवार कुटुंबीयांच्या व्यक्तिमत्त्वांच्या चरणी आमचे सर्व सार्वभौम मतं देऊन त्यांना आमच्या आयुष्याची दोरी त्यांच्या हातात दिली आणि सी.ओ (C.O) साहेब तुमच्या सारखा कुशल कर्तव्यदक्ष अधिकारी बारामती नगरपरिषदेला मिळाला आणि आमच्या गोरगरीब हाडाची काड मांसाचा चिखल करून जगणाऱ्या कष्टकऱ्यांना अन्न पाण्या वाचून मरण्याची वाट पाहायला लावल्याबद्दल आपण धन्य हो..
काही दिवसात प्रशासकीय भवनासमोर चालू असलेलं आंदोलन ही तुम्ही गाजर दाखवून गोड बोलून दिशाभूल करून अबजवी आमिष दाखवून कौशल्य पूर्व हटवाल नाही तुम्ही हटवणारच कारण काही दिवसातच येथे सर्व प्रसारमाध्यमे शिवनगर येथील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी चालू असेल या रणधुमाळीत हे फटक्या कापडातील दरिद्री नारायणाचं दर्शन वृत्तवाहिन्यांना होईल व हे गलिच्छ प्रदर्शन महाराष्ट्रभर दाखवले जाऊ नये व तुमच्या अब्रूला आभाळा एवढा भोक्सा पडू नये त्यामुळे तुम्हाला हे आंदोलन गुंडाळावाच लागेल
नियमबाह्य बेकायदेशीर नदी नाले ओढे, वाहन तळे, खुल्या जागा, बाग, रस्ते गिळंकृत करून अब्जावधीचे इमले बांधून वातानुकूलित घरांमध्ये गुबगुबीत गादीवर झोपून तुम्हाला दुआ देत असतील आमची काळजी नसावी..
आपला
हातगाड्या वाला
फळविक्रेता


