बारामतीत अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज
बारामतीत अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज
बारामती : बारामती तालुक्यातील रुई परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह इमारतीच्या बाजूला आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आई-वडिलांनी रागावल्याने मुलगी घरातून निघून गेली होती. त्यानंतर पोलिसांत तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करण्यात आली. शोधमोहीम सुरू असतानाच मुलीचा मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १० वाजता मुलीला आई-वडिलांनी रागावले होते. त्यानंतर ती घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी परिसरात शोध घेतला; मात्र ती न सापडल्याने २३ ऑगस्ट रोजी पहाटे बारामती तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजि. नं. ४०१/२०२६, कलम १३७(२) BNS अन्वये सकाळी ६.३२ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, शोध घेत असताना डायल ११२ चे पोलीस कर्मचारी कृष्णा कांबळे यांना रुई हद्दीतील स्वामी समर्थ बिल्डिंगच्या बाजूला एक मुलगी मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी जाऊन नातेवाईकांकडून ओळख पटविल्यानंतर तीच बेपत्ता झालेली मुलगी असल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक टीम तसेच डिटेक्शन ब्रांचच्या तीन पथकांना तपासासाठी पाचारण करण्यात आले.
पोलिसांनी स्वामी समर्थ रेसिडेन्सीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेसची पाहणी केली असता टेरेसचा दरवाजा बाहेरून बंद असल्याचे आढळले. स्थानिक मुलांच्या मदतीने शिडीच्या सहाय्याने पोलिसांनी टेरेसवर प्रवेश केला. यावेळी तेथे मृत मुलीची चप्पल आढळून आली.
तसेच इमारतीतील लिफ्टजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, मुलगी रात्री ९.५८ वाजता लिफ्टने वर गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
मुलीच्या शरीरावर तोंडावर खरचटल्याच्या जखमा असून डावा हात आणि डावा पाय फ्रॅक्चर झाल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले. ती पालथ्या अवस्थेत आढळली.
पोलीस तपासातील प्राथमिक परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार मुलीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे पाठविण्यात आला आहे. पीएम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत करीत आहेत.
पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी प्राथमिक माहितीत सांगितले की, आई-वडिलांनी रागावल्यानंतर मुलगी घरातून निघून गेली आणि त्यानंतर इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील टेरेसवरून उडी मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेमुळे रुई परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूमागील संपूर्ण परिस्थिती तपासातून स्पष्ट होणार आहे.


