भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या देखभाल-दुरुस्तीचा ठेका रद्द; बारामती नगरपरिषदेच्या सभेत सर्वानुमते निर्णय


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या देखभाल-दुरुस्तीचा ठेका रद्द; बारामती नगरपरिषदेच्या सभेत सर्वानुमते निर्णय

बारामती, दि. २३ : बारामती नगरपरिषद मालकीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या देखभाल-दुरुस्ती व क्रिकेट अकादमी संचालनासाठी देण्यात आलेला ठेका रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते घेण्यात आला.

नगरपरिषदेने स्टेडियमची देखभाल, दुरुस्ती व क्रिकेट अकादमी चालविण्यासाठी फेब्रुवारी २०२५ मध्ये D.A. Satav Karbhari Anna Charitable Foundation, Baramati या संस्थेला ठेका दिला होता. मात्र करारातील अटी-शर्तींचे पालन न करणे, स्टेडियमच्या स्वच्छता व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष, नागरिकांकडून वारंवार प्राप्त झालेल्या तक्रारी तसेच निविदा दस्तऐवजातील तरतुदींची पूर्तता न करणे आदी बाबींची नोंद नगरपरिषद प्रशासनाने घेतली होती.

स्थळपाहणीदरम्यान स्टेडियम परिसरातील ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छतागृहे, प्रेक्षक गॅलऱ्या, सुरक्षा जाळ्या, मैदानाची देखभाल तसेच सुरक्षा रक्षकांची अनुपस्थिती यांसारख्या अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. याबाबत संबंधित संस्थेला वारंवार नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र समाधानकारक खुलासा अथवा आवश्यक सुधारणा करण्यात आल्या नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

Advertisemen

याशिवाय नगरपरिषदेची पूर्वपरवानगी न घेता स्टेडियमच्या नावात बदल करणे, शुल्कवाढ करणे तसेच विविध सुविधांबाबत तक्रारी प्राप्त झाल्याने प्रशासनाने संबंधित संस्थेविरुद्ध कठोर भूमिका घेतली होती. अखेरीस सर्व बाबींचा विचार करून आजच्या सर्वसाधारण सभेत संबंधित संस्थेचा ठेका रद्द करण्याचा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

ठेका रद्द झाल्यानंतर पुढील निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत स्टेडियमची दैनंदिन देखभाल, स्वच्छता व आवश्यक दुरुस्तीची व्यवस्था नगरपरिषदेमार्फत करण्याबाबतही सभेत चर्चा करण्यात आली. तसेच नवीन निविदा प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीने राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

स्टेडियम हे शहरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमींसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याने त्याची दर्जेदार देखभाल व सुविधांचा विकास करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »