राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षांच्या हस्ते 35 लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण
राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षांच्या हस्ते 35 लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण
बारामती, दि. 18 : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष यांच्या हस्ते बारामती तहसील कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील 35 पात्र व गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री. ढवळे यांनी प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, या उद्देशाने राज्य अन्न आयोग कार्यरत असल्याचे सांगितले. गरजू नागरिकांना सकस, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळावे, तसेच राज्यातील एकही नागरिक उपाशी राहू नये, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुरवठा विषयक कामकाजाच्या आढावा बैठकीनंतर झालेल्या या कार्यक्रमास राज्य अन्न आयोगाचे सदस्य , तहसीलदार , पुरवठा निरीक्षण अधिकारी , पुरवठा निरीक्षक , गोदाम व्यवस्थापक यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व शिधापत्रिकाधारक उपस्थित होते.
कार्यक्रमात अंत्योदय योजनेअंतर्गत दिव्यांग, परित्यक्ता व दुर्धर आजारग्रस्त 15 लाभार्थ्यांना, तर प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे, भूमिहीन शेतमजूर, ऊसतोड कामगार तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल अशा 20 लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.
आढावा बैठकीत श्री. ढवळे यांनी शिधापत्रिकांसंबंधित प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश दिले. तसेच भिक्षेकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी समुपदेशन व निवारा व्यवस्थेवर भर देण्याची गरज व्यक्त केली. बालभिक्षेकऱ्यांसाठी विशेष उपाययोजना राबविणे, भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि गरजू नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हे राज्य अन्न आयोगाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीदरम्यान बारामती तालुक्यातील पुरवठा विभागाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी तहसीलदार श्री. रावडे यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर माहिती सादर केली.


