जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामतीत भक्तिमय वातावरणात स्वागत
बारामती, दि. २६: आज जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बारामती शहरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम…’ च्या जयघोषात आणि अत्यंत भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पाटस रोडवरील देशमुख चौकात प्रशासनाच्या वतीने पालखी रथ आणि दिंड्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी खासदार सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि असंख्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारकऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधा
आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी नगरपरिषदेने जय्यत तयारी केली आहे. शारदा प्रांगण आणि नगरपरिषद परिसरात वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली असून, शहरात विविध ठिकाणी फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करून संपूर्ण शहरात धूर फवारणी करण्यात आली आहे.
‘हरित वारी-सुरक्षित वारी’ उपक्रमाला प्रतिसाद
‘हरित वारी-सुरक्षित वारी’ या संकल्पनेतून शहरात वृक्षारोपण करण्यात येत आहे. प्लास्टिकमुक्त बारामती, प्रदूषणमुक्त वारी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरात जनजागृतीपर उपक्रम राबवले जात आहेत. शहरात कचराकुंड्या, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, सूचना फलक, आपत्ती व्यवस्थापन कक्ष अशा सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या असून, ध्वनीक्षेपकाद्वारे आवश्यक सूचनाही दिल्या जात आहेत.
संस्था आणि शासनाचा सक्रीय सहभाग
बारामती शहरातील चौकाचौकात विविध संस्था आणि संघटनांनी पालखी रथाचे आणि दिंड्यांचे स्वागत करण्यासाठी मंडप उभारले आहेत. अनेक सेवाभावी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सेवा, अल्पोपाहार, फळे, पाणीपुरवठा आणि इतर सेवा पुरवल्या जात आहेत.
या पालखी सोहळ्यात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, आरोग्य विभाग, कौशल्य व उद्योजकता विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, वन विभाग आदी विभागांच्या चित्ररथातून शासनाच्या विविध योजनांविषयी जनजागृती करण्यात येत आहे. या चित्ररथांना वारकरी आणि नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पालखी सोहळ्याचे हे भक्तिमय आणि सुव्यवस्थित आयोजन बारामती शहराच्या आदरातिथ्याची आणि सामाजिक एकजुटीची उत्तम उदाहरण आहे.



