अजितदादांच्या स्मारकावरून नगरपरिषदेत राजकारण तापलं; नवनाथ बल्लाळ यांचा नगरसेवकांना सवाल
बारामती, दि. 23 : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मारक उभारणीच्या विषयावर बारामती नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा रंगली. स्मारक उभारणीसाठी पुढाकार घेण्यावरून नगरसेवकांमध्ये चढाओढ सुरू असतानाच प्रभाग क्रमांक १४ चे नगरसेवक तथा आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ यांनी काही नगरसेवकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली.
सभागृहात बोलताना बल्लाळ यांनी सांगितले की, अजितदादा पवार यांच्याविरोधात यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. त्या वेळी त्यांच्या सन्मानासाठी आणि समर्थनार्थ फार कमी लोक पुढे आले होते. त्या प्रसंगी केवळ नगरसेवक अमर धुमाळ आणि विशाल हिंगणे यांनी ठाम भूमिका घेतली होती. मात्र आता स्मारकाच्या विषयावर अनेक जण पुढाकार घेत असल्याचे दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी विरोधी पक्षातील नगरसेविका आरती शेडगे तसेच काही सत्ताधारी नगरसेवक, नेते आणि गटनेत्यांवरही टीका केली. “जेव्हा अजितदादांबाबत वादग्रस्त वक्तव्य झाले होते, तेव्हा तुम्ही गप्प का बसला होतात? त्यांचा सन्मान राखण्यासाठी त्या वेळी आवाज का उठवला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
स्मारक उभारणीसाठी सूचक होण्याची स्पर्धा सुरू असल्याचा उल्लेख करत बल्लाळ यांनी काही जण केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी पुढाकार घेत असल्याचा आरोप केला. अजितदादांप्रती खरी निष्ठा कृतीतून दिसली पाहिजे, केवळ भाषणातून नव्हे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बल्लाळ यांच्या वक्तव्यानंतर सभागृहातील वातावरण काही काळ तापले. स्मारकाच्या विषयावर सुरू झालेली चर्चा नंतर राजकीय भूमिका, निष्ठा आणि नेतृत्वाच्या प्रश्नांवर केंद्रित झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या वक्तव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्येही चर्चेला उधाण आले असून, बारामतीच्या राजकीय वर्तुळात या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे.


