गुटखा माफियांना पोलिसांचे अभय? बारामती शहरासह तालुक्यात सर्रास गुटखा विक्री!
बारामती: बारामतीमध्ये गुटखा माफियांना पोलिसांचे अभय मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाकडून गुटख्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असली तरी, बारामती शहरासह तालुक्यात सर्रास गुटख्याची विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, या अवैध धंद्याकडे पोलिसांनी हेतुपुरस्सर व सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
शहरातील पानटपरी आणि किराणा दुकानांमध्ये राजरोसपणे गुटख्याची पाकिटे विक्रीसाठी ठेवलेली दिसत आहेत. तरुण आणि शाळकरी मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. या गंभीर प्रकाराबाबत अनेक नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
गुटखा माफिया आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांचे साटेलोटे असल्यामुळे या अवैध धंद्यावर कारवाई होत नाही असेही बोलले जात आहे. यामुळे गुटखा माफियांचे मनोबल वाढले असून ते बिनधास्तपणे आपला व्यवसाय चालवत आहेत.
या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि तात्काळ प्रभावी कारवाईची मागणी केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेऊन गुटखा माफियांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा, या विरोधात मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.