कृषि विद्यान केंद्र, बारामतीला मधमाशी कार्यासाठी पुरस्कार


हिमाचल प्रदेश : भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली मार्फत देशात विविध संशोधन प्रकल्प राबविले जातात. त्याअंतर्गत अखिल भारतीय समन्वयित मधमाशी व परागीभवन करणारे कीटक प्रकल्प देशातील २४ राज्यांमध्ये राबविला जात आहे. ह्या प्रकल्पामध्ये मधमाशी, इतर परागीभवन करणारे कीटक, संशोधन व विस्तार हे कार्य केले जाते. ह्या प्रकल्पाची वार्षिक आढावा बैठक २७ ते २९ सप्टेंबर, २०२४ रोजी पालमपूर कृषि विद्यापीठ, हिमाचल प्रदेश येथे पार पडली. ह्यावेळी देशातील विविध केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ह्या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, बारामती हे २०१७-१८ पासून कार्य करत असून ह्यामध्ये डाळिंब, कांदा बिजोत्पादन, शेवगा पिकासाठी मधमाशीचे महत्त्व, पीक उत्पादनवाढ, मध, मेण, राजन्न व इतर उत्पादने, वनस्पती फुलोरा व स्थलांतर व्यवस्थापन, प्रशिक्षणे व आदिवासी विकास योजना राबविणे असे विविध उपक्रम राबविले जातात.

ह्या प्रकल्पांतर्गत शेतकरी, महिला शेतकरी व ग्रामीण युवक यांच्यासाठी प्रशिक्षणे घेण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण, मधमाशी पेटी व इतर साहित्य वाटप, व त्यामधून पिकाचे उत्पादन वाढ, अशा कामांसाठी उत्कृष्ट व देशात सर्वोत्तम कार्यासाठी केंद्राला पुरस्कार देण्यात आला.

Advertisemen

ह्यावेळी भारतीय अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे डॉ. टी. आर. शर्मा, महासंचालक (पीक विज्ञान), डॉ. पूनम जसरोटीया, सहाय्यक महासंचालक (पीक संरक्षण व जैवसुरक्षा), डॉ. नवीन कुमार, कुलगुरू, कृषी विद्यापीठ पालमपूर डॉ. सुनील सुरोशे, प्रकल्प समन्वयक, डॉ. दास, संचालक राष्ट्रीय मधमाशी मंडळ, नवी दिल्ली, डॉ. प्रदीप चुनेजा, डॉ. अतौर रहमान व इतर मान्यवर उपस्थित होते.

केंद्रामार्फत पुढील कालावधीत महिला बचत गट व शेतकरी उत्पादक कंपनी माध्यमातून मध उत्पादनाला चालना देण्याचे काम करण्याचा मानस आहे असे श्री राजेंद्र पवार, चेअरमन, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांनी सांगितले.

संस्थेमार्फत विविध प्रशिक्षणे राबवून उद्योजकता विकासाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतल्याचे श्री. निलेश नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांनी सांगितले.

मधमाशी व इतर पूरक उद्योगांसाठी नाबार्ड, आत्मा, कृषि विभाग, राष्ट्रीय मधमाशी बोर्ड व इतर संस्थाबरोबर काम करत असल्याचे डॉ. मिलिंद जोशी, प्रकल्प समन्वयक, कृषिविज्ञान केंद्र, बारामती यांनी सांगितले. पुढील काळात, राजन्न उत्पादन, राणीमाशी पैदास, इतर उत्पादने ह्यासाठी काम करत असल्याचीही ते म्हणाले.

ह्या पुरस्कारासाठी श्री. राजेंद्र पवार, चेअरमन, श्री. निलेश नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी व श्री डॉ. धीरज शिंदे, प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र, बारामती, यांनी आनंद व्यक्त केला व ह्यासाठी श्री. अल्पेश वाघ, श्री प्रशांत गावडे, श्री सचिन क्षीरसागर व संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »