तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू इ.राज्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला
प्रमुख पाहुण्यांच्या भेटीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांत कुमार पाटील तसेच राज्याचे फलोत्पादन संचालक मा. श्री कैलास मोते यांनी या प्रदर्शनास भेट दिली.
बारामती – अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या फार्म वरती सुरू असलेल्या जागतिक दर्जाच्या कृषी प्रदर्शनामध्ये आज दुसऱ्या दिवशी विविध मान्यवरांनी भेट दिली त्याचबरोबर राज्यभरातील सर्व जिल्ह्यातून शेतकऱ्यांसह आज तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा, तामिळनाडू इ.राज्यातील शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या भेटीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांत कुमार पाटील तसेच राज्याचे फलोत्पादन संचालक मा. श्री कैलास मोते यांनी या प्रदर्शनास भेट दिली. हे प्रदर्शन आत्मा, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, नाबार्ड तसेच काही खाजगी कंपन्या यांच्या सहकार्यातून होत आहे. या प्रदर्शनामध्ये 150 पेक्षा जास्त कंपन्यांचे स्टॉल आहेत. भाजीपाला पिकांबाबत असलेले नवीन तंत्रज्ञान त्याचबरोबर फुल शेतीमध्ये आलेले विविध नवीन वाण व लागवड पद्धती, त्याचे नियोजन याबाबतची माहिती घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल जाणवला.
ऊस पिकांमधील असलेल्या विविध प्रजाती व त्याची लागवड पद्धती त्यासाठी वापरलेले ठिबकचे तंत्रज्ञान व खत पद्धती, चायनीज पद्धतीने केलेली मका लागवड, पांढरा झेंडू, भाजीपाल्याचे विविध प्रकार याची माहिती शेतकरी उत्सुकतेने घेताना दिसले. कमी खर्चातील शेती मशागत औजारे, औषध फवारणी औजारे याची देखील माहिती शेतकरी घेत होते.
या प्रदर्शनामध्ये 20 जानेवारी ते 21 जानेवारी दरम्यान डॉक्टर आप्पासाहेब पवार अश्वप्रदर्शन आयोजित केले आहे. यामध्ये मारवारी आणि भीमथडी देखणे दिमागदार उत्तम प्रतीचे अश्व प्रदर्शित करण्यात येणार आहेत तसेच या ठिकाणी दररोज होलस्टेन फ्रिजियन गाईचे दूध उत्पादन स्पर्धा ही आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये शेतकरी आपल्या गाय सह सहभागी होत आहेत. या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राचे विविध उत्पादने, जीवाणू खते, बायोप्रोम व औषधे, फळ व भाजीपाला रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर सिद्ध वळूची वीर्य मात्रा आणि दर्जेदार गाभण कालवडी खरेदीसाठी संधी आहे.
आजच्या प्रदर्शनात आलेल्या शेतकऱ्यांचे गर्दी पाहता उद्या आणि परवा ही या प्रदर्शनाचे नियोजन योग्य रीतीने व्हावे यासाठी ट्रस्टचे चेअरमन श्री राजेंद्र दादा पवार व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे हे सर्वत्र स्वतः जातीने लक्ष देऊन काही त्रुटी राहू नये म्हणून योग्य सूचना देत आहेत.
विविध भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून आपण ही या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे सांगितले.
श्री. पंडित थोरात, खानापूर तालुका, जिल्हा परभणी – माझे हे पाचवे वर्ष पहाण्याचे आहे. सर्व नियोजन उत्तम झाले आहे. मला व्हाट्सअप वरती मेसेज आला होता. या ठिकाणी फुले आणि भाजीपाला पिकांमध्ये जे तंत्रज्ञान वापरले आहे ते मला अतिशय आवडले व ते मी माझ्या शेतात करणार आहे.
श्री सुभाष मोदगे, बेळगाव तालुका, जिल्हा बेळगाव – मी यापूर्वी दोन वेळा हे प्रदर्शन पाहण्यासाठी आलो होतो. यावर्षी मला मत्स्य शेतीची माहिती आवडली.
श्री नेताजी शिंदे, मु,पो,धाराशिव – मला फेसबुक वरून या प्रदर्शनाची माहिती मिळाली. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमधील वापर यावर आधारित प्लॉट आवडले.