पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान येथील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास सहभाग नोंदवला
बारामती – अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या फार्म वरती सुरू असलेल्या जागतिक दर्जाच्या कृषिक या कृषी प्रदर्शनामध्ये आज तिसऱ्या दिवशी विविध राज्यातील शेतकऱ्यांनी भेट दिली. त्यामध्ये पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान येथील शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास सहभाग नोंदवला. आज या प्रदर्शनामध्ये पतंजलीचे आचार्य बाळकृष्ण यांनीही भेट दिली. त्यांनी प्रक्षेत्रावर असलेले विविध तंत्रज्ञान जाणून घेतले तसेच ट्रस्टचे विश्वस्त श्री. रणजीत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या डॉक्टर आप्पासाहेब पवार अश्वप्रदर्शनाचे उद्घाटन केले. या अश्व प्रदर्शनामध्ये विविध राज्यातील 100 मारवारी जातीचे घोडे सहभागी झाले होते. यानंतर आचार्यांनी शेतकरी व विद्यार्थांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांचा कल हा शेतीसाठी उपयोगी असलेली विविध यंत्रसामुग्री, ट्रॅक्टरचलित अवजारे, आंतर मशागतीचे अवजारे माहिती घेण्यावरती दिसला. औषध फवारणी यंत्रे असतील किंवा इतर यंत्रांमध्ये शेतकरी माहिती घेत असताना दिसले.
आज डॉग शो चे ही आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये तीन प्रजातीच्या कुत्र्यांचा सहभाग होता. त्यातील श्री रितेश नांगरे यांच्या टॉय या जातीच्या श्वानाला प्रथम क्रमांक मिळाला. त्याचबरोबर इंडियन जातीमध्ये श्री आदित्य जाधव बारामती व मिडीयम जातीमध्ये किरण दळवी, बारामती यांच्या श्वानाला प्रथम क्रमांक मिळाला.
या डॉग शोचे पारितोषक वितरण चेअरमन माननीय राजेंद्र दादा पवार यांच्या हस्ते पार पडले. दि २१ जानेवारी रोजी अश्वप्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध भीमथडी जातीचा शो असणार आहे. त्यामध्ये सुमारे पन्नास घोडे सहभागी होतील. हे प्रदर्शन सोमवार दि. 22 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांसाठी खुले असणार आहे याचा लाभ शेतकर्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रोफेसर निलेश नलावडे यांनी केले.