काटेवाडीत वर्षानुवर्षे समाजमंदिर बंद; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल सार्वजनिक वास्तू असूनही नागरिक वापरापासून वंचित; अस्वच्छतेमुळे परिसराची दुरवस्था
काटेवाडीत वर्षानुवर्षे समाजमंदिर बंद; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल
सार्वजनिक वास्तू असूनही नागरिक वापरापासून वंचित; अस्वच्छतेमुळे परिसराची दुरवस्था
काटेवाडी | ता. बारामती
काटेवाडी, ता. बारामती येथील समाजमंदिर वर्षानुवर्षे बंद असल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांच्या सामाजिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी उभारण्यात आलेली ही वास्तू दीर्घकाळ बंद असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.
समाजमंदिराचा वापर होत नसल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली असून सार्वजनिक वास्तूची देखभाल व स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. नागरिकांच्या सार्वजनिक वापरासाठी उभारण्यात आलेली वास्तू वर्षानुवर्षे बंद ठेवली जात असेल, तर “समाजमंदिराचा नागरिकांना वापरच करता येत नसेल, तर ते उभारण्याचा उपयोग काय?” असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
ग्रामपंचायतीने भूमिका स्पष्ट करावी
समाजमंदिर ग्रामपंचायतीच्या ताब्यात किंवा मालकीचे असल्यास त्याची देखभाल, स्वच्छता आणि नागरिकांच्या वापराची व्यवस्था कोणत्या पद्धतीने केली जाते, याबाबत ग्रामपंचायतीने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे.
समाजमंदिर वर्षानुवर्षे बंद ठेवण्याचे नेमके कारण काय? ते बंद ठेवण्याबाबत ग्रामपंचायतीचा अधिकृत ठराव आहे का? नागरिकांना वापरासाठी परवानगी का दिली जात नाही? परिसराची स्वच्छता करण्यासाठी कोणती कार्यवाही करण्यात आली? तसेच समाजमंदिर नागरिकांसाठी पुन्हा कधी खुले होणार, याबाबत ग्रामपंचायतीने माहिती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सार्वजनिक वास्तू की कायमचे कुलूप?
नागरिकांच्या सोयीसाठी उभारलेल्या समाजमंदिराला वर्षानुवर्षे कुलूप लागून राहणे आणि परिसरात अस्वच्छता निर्माण होणे ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याची गरज आहे. संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक दुरुस्ती व स्वच्छता करून समाजमंदिराचा नागरिकांना उपयोग करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, समाजमंदिर बंद ठेवण्यामागील नेमके कारण आणि याबाबत ग्रामपंचायतीची अधिकृत भूमिका काय आहे, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.


