कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर; मुस्लिम होतकरूवर कोयत्याने सपासप वार! बारामतीत दहशतवादी कोयता गँग सक्रिय !
नदीम कुरेशीवर कोयत्याने हल्ला
सोनं, रोकड व दुचाकी वाहन घेऊन मारेकरी फरार
बारामती: लाकडी-म्हसोबाचीवाडी रोडवर शेतकर्याकडून खरेदी केलेली जनावरे घेऊन जाणार्या वाहनावर काही समाजकंटकांनी हल्ला करून नदीम मुनीर कुरैशी यास कोयत्याने जखमी करून बेदम मारहाण करून सोन्याची अंगठी, रोकड व दुचाकी घेऊन फरार झालेले अक्षय देवकाते, गौरव टिंगरे इतर 4 अनोळखी इसमांवर भिगवण पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.कलम 307, 324, 327, 143, 147 व 149 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये केलेल्या कोयता हल्ल्यात नदीम गंभीर जखमी झाला आहे बारामती येथील गावडे हॉस्पीटल येथे उपचार घेत आहे.
गुरांची वाहतुक करणार्या वाहनावर कारवाई करण्याचा अधिकार पोलीसांना आहे. संबंधित वाहनावर किंवा करीत असलेल्या वाहतुकीवर संशय असल्यास पोलीसांना खबर देवून, पोलीसांकडून काही सिद्ध झाल्यास त्यावर कारवाई केली जाते. मात्र, वाहन थांबवून त्यामध्ये कायदेशीर किंवा बेकायदेशीर वाहतुक केली जात आहे हे सांगणारे किंवा संबंधित वाहतुक करणार्यांना मारहाण करणारे, त्यांच्यावर खूनी हल्ला करणारे कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. कायद्याचे रक्षक असताना, अनाधिकृतपणे भक्षक निर्माण होत असतील तर यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, नदीम कुरेशी याचा शेतकर्यांकडून गुरे खरेदी करून ते बाजारात विक्री करण्याचा व्यवसाय आहे. दि.10 फेब्रुवारी रोजी नदीम महिंद्रा पिकअप घेऊन व नदीमचा भाचा साहील अब्दुल करीम कुरेशी, पुतण्या अरबाज सलीम कुरेशी हे दोघे दुचाकी स्प्लेंडर वाहनावर वडगाव निंबाळकर, कोर्हाळे (ता.बारामती) व लाकडी (ता.इंदापूर) येथुन जनावरे खरेदी घेऊन दुपारी 2 च्या सुमारास लाकडी ते म्हसोबाचीवाडी खडीमशीन शेजारी पिकअपमध्ये शेतकर्यांनी विक्री केलेले खोंड भरीत असताना याठिकाणी अक्षय देवकाते, गौरव टिंगरे व त्यांचे चार साथीदार सदर ठिकाणी आले व त्यांनी जनावरांची वाहतूक करता काय? असे म्हणून नदीम, साहिल यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यामध्ये गौरव टिंगरे याने त्याचे हातातील कोयत्याने मारहाण केली. याला आज जिवंतच ठेवत नाही असे म्हणून नदीमच्या खांद्याला, डाव्या हाताला, डोक्याला कोयता मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सदरचा प्रकार पाहता नदीमचा पुतण्या अरबाज घाबरून तिथून पळून गेला. अक्षय देवकाते व त्यांचे सर्व साथीदारांनी हाताने, दगडाने व लाथा बुक्क्याने मारहाण करण्यास सुरूवात केली. या मारहाण करण्यामध्ये एक पांढरा टी-शर्ट घातलेला मुलगा याने आज याला खलासच करतो असे म्हणून माझे डोक्यात दगड मारला, यातील काळा टी-शर्ट व दाढी वाढलेल्या मुलाने नदीमचा भाचा साहिल कुरेशी यास डाव्या बाजूला पाठीमागील बाजूस खुब्याचे खाली कोयता मारून दुखापत केली आहे. यावेळी वालचंदनगर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीणचे वाहन पाहताच क्षणी मारेकरी येथुन पळून गेले. या मारहाण दरम्यान मारेकरींनी खिश्यातून 50 हजार रूपये, हातातील एक तोळ्याची अंगठी घेऊन पसार झाले. मारेकर्यांनी तेथुन नदीमच्या पुतण्याचे वाहन एमएच42 डब्ल्यू 7945 घेऊन गेले. नदीमला वालचंदनगर पोलीसांनी देसाई हॉस्पीटल, लासुर्णे येथे उपचाराकरीता घेऊन गेले. तद्नंतर गावडे हॉस्पीटल याठिकाणी उपचारासाठी दाखल केले आहेत.
बारामतीत कोयता गँगच्या काही महिन्यापूर्वीच पोलीसांनी मुसक्या आवळल्या होत्या मात्र, आता कोयता गँगने चक्क जनावरे वाहतुक करणार्या व्यापारी व इतरांवर हल्ला करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वत्र दहशीतीचे वातावरण पसरले आहे. या सर्व मारेकर्यांना पोलीसांनी तातडीने अटक करून, सतत समाजात त्रास देणार्या अशा लोकांवर कडक कारवाई करावी अन्यथा सर्व समाज रस्त्यावर उतरणार असल्याचे समजते.