प्रांत साहेब नीट जगू द्या आणि शेती करू द्या!
बारामती – मोरगाव मार्गे ढाकाळे मुंढाळे जाणाऱ्या रस्त्यांवरती प्रदूषणाचे जाळे पसरले आहे. तुमच्या आशीर्वादाने माती, मुरूम, खाण, दगड, क्रशर, खडीमशीन कायदेशीर बेकायदेशीर बिंदासपणे चालू आहेत. धुलकणांनी येथून प्रवास करणे मुश्कील आहे. तर इथं राहणाऱ्या माणसांच्या आरोग्य विषयी न लिहणं बोलणं बरं धुलकणांनी संपूर्ण वातावरण प्रदूषित झाले आहे. परिसरातील गावांमध्ये फुफुसाच्या रोगांचा भयंकर प्रादुर्भाव आहे. इथल्या जमिनी नापीक होत असून पिकाऊ जमिनीची उत्पादन क्षमता संपत आहे तर इथं उगवणारे पावसाच्या जीवावर पिकणारे पीक कसदार पिकत नाही. दाण्यांचा आकार अतिशय लहान असून दर्जाहीन आहे. इथे पिकणारी फळं ही चवी शिवाय असून त्यांना कसलीही चव लागत नाही. त्यामुळे बाजारपेठेत यांचा भाव शून्य आहे. तरकारी पिकवली जात नाही. कारण धुळकणांनी तरकारी ला रंगच येत नाही. इथल्या अवजड यंत्रसामग्रीच्या आवाजाने स्थानिक लोक बहिरे होत आहेत. डोळ्याला अंधत्व येण्याचे प्रमाण वाढले असून रहिवाशांचे आयुर्मान कमी झाले आहे. खाणीमध्ये लावणाऱ्या सुरूगांमुळे भूगर्भातील पाण्याची दिशा बदलली आहे. डोंगर फोडून मुरूम माफीया येणाऱ्या पावसाच्या पाण्याचं नियोजन बदलत आहेत. एवढं सारं अमानवी घटना घडत असताना प्रांतसाहेब वातानुकूलित गाडी, घर व कार्यालयामध्ये बसून आपणास या मनुष्यमात्राची, प्राणीमात्राची, पशुपक्ष्यांची दया येत नाही का? गौण खनिज माफीयांच्या मलिद्याने पोट भरत नसल्याने अन्य मार्गाने घरंदारं बांधायचं काम चालू आहे. कायद्याचे लाखो निर्बंध घालून स्वतःला उच्चपदस्थ अधिकारी म्हणणारे आपल्यासारखे कर्तव्य शून्य निष्क्रिय अधिकारी असल्याने लाज वाटते. लाजची जागा उघडी करून उपरणं डोक्याला बांधणारे आपले सारखे अधिकारी निसर्गाचा समतोल व कायद्याची अंमलबजावणी करण्यापेक्षा ज्या मातीत आपण जाणार आहोत त्याच मातीला विकून धनिक होणारे चापलूशी अधिकारी समृद्ध बारामतीला या पृथ्वीच्या नकाशावरून संपुष्टात आणू नये हीच अपेक्षा..
संपूर्ण कायदा उगळुन पिऊन खाऊन झाल्यानंतर विष्टेचं खत करून पुन्हा नालायक अधिकारी जन्माला घालण्याची प्रक्रिया बारामती तालुक्यात जोमाने चालू आहे. बारामतीचा स्मशानवाटा करू नका रे! तुमच्या लेकरा बाळाला लय शाप लागत्याल सांभाळून सावधान रहा.!


