शगणशहा दर्गा मस्जिद येथे झरेकर दिंडीचे स्वागत; हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
बारामती/प्रतिनिधी : सालाबादप्रमाणे यंदाही जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सहभागी असलेली खेड तालुक्यातील झरेकर दिंडी शगणशहा दर्गा मस्जिदच्या परिसरात मुक्कामी दाखल झाली. यावेळी दिंडीतील वारकरी आणि सेवेकऱ्यांचे मुस्लिम समाजाच्या वतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
शगणशहा दर्गा मस्जिदच्या जागेत दरवर्षीप्रमाणे दिंडीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. वारकऱ्यांसाठी लाईट, पिण्याचे पाणी तसेच इतर आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली.
या सेवाकार्यात शगणशहा दर्गा मस्जिद मुस्लिम समाजासह शिवसेनेचे शहरप्रमुख शौकत बशीर बागवान, अल्ताफ आतार, फिरोज आतार, आशिफ बागवान, अयुब बागवान आणि अखिल शेख यांनी सक्रिय सहभाग घेतला.
वारकरी संप्रदायाची सेवा आणि मुस्लिम समाजाचे सहकार्य यामुळे सामाजिक सलोखा व हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सुंदर दर्शन घडले. उपस्थित वारकऱ्यांनीही या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.


