बारामती शहर एम.एस.ई.बी चा भोंगळा कारभार!
बारामती– बारामतीत एम.एस.ई.बी च्या भोंगळ्या कारभाराचा फटका बारामतीतल्या ग्राहकांना रोजच बसत आहे. बारामती शहर एम.एस.ई.बी कार्यक्षेत्रात रोजच कुठे ना कुठे विद्युत पुरवठा खंडित होत आहे. कार्यालयीन दूरध्वनी बंद पडलेला आहे, लागलाच तर कोणी उचलत नाही. कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्यात समन्वयाचा अभाव असून नियुक्त कार्यक्षेत्रात कर्मचारी उपस्थित नसतात. अनेक वायरमेनचे भ्रमणध्वनी क्रमांक ग्राहकांकडे नसल्यामुळे ग्राहकांची कुचंबना होत आहे. कार्यालयात हेलपाटे मारून ग्राहकांच्या पदरी निराशा येत आहे. रात्री अपरात्री विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांनी कोणाकडे तक्रार करायची हा यक्ष ब्रह्म प्रश्न ग्राहकांसमोर असून या प्रश्नाचे उत्तर बारामतीच्या देवानेच द्यावे.
टोल फ्री नंबर कधीच लागत नाही लागला तर तासभर संगणकीय प्रश्न विचारल्यानंतर फोन आपोआप बंद होतो. तासंतास विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतरही विद्युत पुरवठा का खंडित झाला व केव्हा सुरू होणार याबद्दलची कल्पना ग्राहकांना कधीच मिळत नाही. जो त्याचा अधिकार आहे. एम.एस.ई.बी मध्ये संगणकीकृत प्रणाली कार्यान्वित नसून कोट्यावधी रुपये खर्च करून सरकारने डिजिटल महाराष्ट्र केला. असे असतानाही बारामती शहर विद्युत कंपनी आजही नियमानुसार शासनाच्या व विद्युत कंपनीच्या निर्देशांनुसार संगणकावर आवश्यक माहिती भरली जात नाही. संगणक यंत्रसामग्री अपुरी असून कार्यालयाकडे एकही प्रिंटर उपलब्ध नाही. या कार्यालयात तक्रार नोंदवही नाही, सूचना नोंदवही नाही, हालचाल नोंदवही नाही, कुठला कर्मचारी अधिकारी कुठे काय करतो, कुठे शिरतो कर्तव्यावर आहे का वैयक्तिक काम करतो हे समजण्यापलीकडे हे कार्यालय आहे. अशा दयनीय अवस्थेत बारामती शहर विद्युत विभाग काम करीत आहे. ग्राहकांना आवश्यक असणारी माहिती ग्राहकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर पाठवले जात नाही किंवा दिसतही नाही. विद्युत कंपनीच्या पूर्व सूचना ग्राहक क्रमांकाच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर कधीही पाठवले जात नाही. एक संदेश एक बटणावर हजारो ग्राहकांपर्यंत एका क्षणात पोचू शकतो. पण एवढे कष्ट घेण्याची तयारी व मानसिकता कार्यालयीन प्रमुख व कर्मचाऱ्यांची नाही. भूमिगत विद्युत वाहिन्यांचा टिमका मिरवणाऱ्या विकसित बारामती मध्ये भिकारातले भिकार कार्यालय व कार्यपद्धतीचा आदर्श नमुना बारामती शहर विद्युत विभाग, विद्युत विभागाच्या जाचाला कंटाळून बारामतीच्या ग्राहकांनी तक्रार करणे सोडून दिले असून देवाच्या भरोशावर बारामतीचे विद्युत प्रवाह आज चालू आहे. विद्युत प्रवाह खंडित झाला काय आणि सुरू झाला काय आणि बंद झाला काय याबद्दल बारामतीतील ग्राहकांना “रोजचं मडं त्याला अन कोण रडं” अश्या भावनेतून जगण्याची वेळ आली आहे.
विद्युत विभागाच्या अकार्यक्षम उदासीन कार्यपद्धतीमुळे सरकारची बदनामी तर होतच आहे. पण बारामतीच्या विकासाची अब्रूची लक्तरे महाराष्ट्र विधान भवन मुंबईच्या वेशीवर नव्हे फाटकावर वाळायला टाकलेली आहेत आणि त्याच्या दुर्गंधीने महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना बारामतीच्या कार्यसम्राट आमदार साहेबांना नाक धरून विधानसभेत वावरावे लागते हे दुर्दैव..!


